महाविकास आघाडीसह महायुतीतही फुट
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक - या निवडणुकीत रामटेक विधानसभेत फुटी चे राजकारण उमेदवारासह संबंधीत पक्षाला चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे दिसुन येत आहे... निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार एकमेकांचीच मते खाणार असल्याने कोण निवडुण येईल याबाबद साधा अंदाजही लावणे कठीण झाले आहे... दोन्ही बलवान पक्षातील विविध नेत्यांनी पदाच्या लालसेत बंडखोरी केल्यामुळे येथील दिग्गज उमेदवारही मोठ्या विवंचनेत दिसुन येत आहे...
रामटेक विधानसभेतील महाविकास आघाडीचा प्रबळ उमेदवार असतानाही उमेदवारी न मिळाल्याने तथा संतप्त काँग्रेसजनांच्या मागणीवरून नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत खासदार श्यामकुमार बर्वे व माजी मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला...
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला... कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकचे सभापती व सुनील केदार यांचे निकटवर्तीय सचिन किरपान यांनी महाविकास आघाडीला धक्का देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला... कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या विविध विकासकामांमुळे आणि तरुण चेहरा असल्याने त्यांनी तिकिटाची मागणीही केली होती... तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त करत त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलल्या जात आहे...
रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. चौकसे यांनी एका उमेदवारी अर्जात काँग्रेस पक्षाचा तर दोनमध्ये अपक्ष उमेदवार असा उल्लेख केला आहे. महायुतीचे शिवसेना (उभा) उमेदवार डॉ. विशाल बरबटे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला. तेव्हा काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता, हे विशेष.
रामटेकात बंडखोरीने समीकरणे बदलणार
शिवसेना नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे यांनी महायुतीच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला... विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांच्याशी जवळीक असल्याने धोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे... महायुतीपासून बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला... ठाकरे यांच्यासोबत भाजपचे सक्रिय सदस्य आणि नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला...
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांनी सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तथा महामंत्री उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला...