सोगाव - अब्दुल सोगावकर : दी लाईफ फाऊंडेशन, जिल्हा रुग्णालय अलिबाग, आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, दि २२ आणि २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दोन दिवस महिला व पुरुषांसाठी कर्करोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...
याशिबिरात उपस्थित स्त्री पुरुषांची नाक, कान, घसा तपासणी (ENT Check-up), चिकित्सक तपासणी (Physician Check-up), गर्भाशयाच्या मुखाची तपासणी (PAP Smear), रक्त तपासणी (Hb-WBC), स्तन तपासणी (Breast Check-up), ह्युमन पापिलोमा व्हायरस चाचणी (HPV Hybrid Capture 2) या प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या...
सदर कार्यक्रम दी लाईफ फाऊंडेशनच्या सह संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम लालवानी, जिल्हा रुग्णालय अलिबागचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित करण्यात आला.. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, मुंबई (स्पॉन्सर्ड बाय पॉवरीका लिमिटेड) च्या वतीने या तपासण्यांसाठी श्रीमती नीता मोरे(एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर), श्रीमती मिनल परब(सहायक डायरेक्टर), डॉ. रचना मेहरा(स्त्रीरोग तज्ञ), डॉ. संजय घीलदियाल (नाक, कान, घसा विशेषज्ञ), डॉ. सतीश काणेकर (चिकित्सक), आणि डॉ. वीणा बोरकर (फिजिशियन) व त्यांची टीम उपस्थित होती... दोन दिवसीय तपासणी शिबिराचा सुमारे २५० हून अधिक महिला आणि पुरुषांनी लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली... शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे आणि त्यांचे सहकारी राखी राणे, प्रणय ओव्हाळ, आणि मनस्वी थळकर तसेच जिल्हा रुग्णालयातील मेट्रन आणि परिचारिका यांनी विशेष मेहनत घेतली...
कर्करोगाचे प्रारंभिक निदान व आरोग्य तपासणीमुळे रोगाच्या उपचारात मोठी मदत होते, आणि अशा उपक्रमांच्या माध्यमातून जनतेत आरोग्यविषयी जागरूकता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे...या शिबिराचा लाभ सर्व महिला व पुरुषांनी घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले...
यावेळी दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे यांनी दी लाईफ फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, दी लाईफ फाऊंडेशन गेल्या २३ वर्षांपासून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे... संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विकासाला हातभार लावणे हा आहे... या उद्देशाने प्रेरित होऊन दी लाईफ फाऊंडेशनने अनेक वेळा विविध ठिकाणी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे, ज्याद्वारे लोकांपर्यंत कर्करोगाच्या प्रारंभिक निदानाचे महत्त्व पोहोचवले जात आहे... कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे प्रारंभिक निदान व उपचार यावर विशेष भर दिला जातो... कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचारांचे प्रमाण आणि यशस्वीपणा वाढतो.. याच दृष्टीकोनातून दी लाईफ फाऊंडेशन नियमितपणे कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करते, ज्यामुळे समाजात जागरूकता निर्माण होते आणि अनेकांचे प्राण वाचवणे शक्य होते...
दी लाईफ फाऊंडेशनच्या या उपक्रमांद्वारे नागरिकांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक करण्याचे कार्य केले जात आहे, जे आरोग्याची काळजी घेण्यासोबतच कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रारंभिक टप्प्यातच रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते... दी लाईफ फाऊंडेशन आपल्या सेवांद्वारे आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कायमस्वरूपी बदल घडवून आणण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे, आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देत आहे, असे शेवटी सांगितले...
फोटो लाईन : जिल्हा रुग्णालयात कर्करोग व आरोग्य तपासणी शिबीरात उपस्थित महिला व पुरुष यांची तपासणी करताना डॉक्टर,
