सोगांव - अब्दुल सोगावकर :
रायगड जिल्ह्यात मागील काही काळापासून किडनीच्या आजाराचे रुग्ण व डायलिसिसच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, मात्र अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात डायलिसिस रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत डायलिसिस मशीनची संख्या कमी प्रमाणात आहे. यामुळे सर्वसामान्य डायलिसिस रुग्णांची गैरसोय होऊन मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे...
याबाबत सामाजिक कार्यात नेहमीच सहकार्याची व योगदानाची महत्वपूर्ण भूमिका घेत असलेल्या दी लाईफ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी व जबाबदारी ओळखून जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या रायगड जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग येथे सोमवार दि.३ जून २०२४ रोजी दी लाईफ फाऊंडेशनतर्फे मोफत किडनी डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे...
ही आधुनिक तंत्रज्ञानाची डायलिसिस मशीन दी लाईफ फाऊंडेशनच्या सहसंस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम लालवानी यांच्या सक्रिय योगदानाने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, दी लाईफ फाऊंडेशनच्या सहसंस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम अजित लालवानी, विश्वस्त अजित लालवानी, सोहेल लालवानी तसेच श्रीमान व श्रीमती पंकज मेहरा आणि दी लाईफ फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील डायलिसिस विभागाचे कर्मचारी व नर्स उपस्थित होते...
यावेळी दी लाईफ फाऊंडेशनच्या सहसंस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम लालवानी यांनी बोलताना सांगितले की, आम्ही दी लाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील सुरुवातीच्या काही तालुक्यात शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करीत आहोत, आज दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे व डॉ अंबादास देवमाने यांच्या या विषयीच्या पूर्व चर्चा भेटीनुसार, अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात डायलिसिस मशीनची असलेली कमतरता पाहुन आम्ही आपली सामाजिक बांधिलकी व जबाबदारी ओळखून गरीब डायलिसिसवर असलेल्या रुग्णांच्या सेवेखातीर डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिली आहे. या डायलिसिस मशीनचा लाभ सर्वसामान्य गरीब डायलिसिस रुग्णांनी करून घ्यावा, असे शेवटी सांगितले...
दी लाईफ फाऊंडेशनच्या सहसंस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम लालवानी यांनी सुमारे ६ लाख ८० हजार पाचशे रुपये किमतीची डायलिसिसची मशीन मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी विशेष आभार मानले..
फोटो लाईन : दी लाईफ फाऊंडेशन तर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात डायलिसिस मशीनचे उद्घाटन करताना संस्थेचे संचालक व डायलिसिस विभागातील कर्मचारी व इतर मान्यवर,
