महाराष्ट्र वेदभुमी

रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

 


 रायगड जिमाका 

दि. ३१- रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि ५ जून  रोजी स. ८ वा. अलिबाग, नेहूली येथील  क्रीडा संकुलात मतमोजणीस सुरुवात होणार आहे.३२ रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली...

मतदानाची टक्केवारी

रायगड लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी ७ मे २०२४ रोजी एकूण २ हजार १८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीमध्ये एकूण ६०.५१ टक्के एवढे मतदान झाले...

पेण ६४.५१ टक्के, 

अलिबाग ६६.६७%, 

श्रीवर्धन ५९.२०%,

महाड ५७.५६%, 

दापोली ५७.३७% 

गुहागर ५६.४४% 

 अलिबाग नेहूली येथील  क्रीडा संकुलात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या निवडणूक  मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत... याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल... 

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत...

१९१ पेण विधानसभा मतदारसंघासाठी १४  टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २७ फेऱ्या होणार आहेत... 

 १९२अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीच्या २७ फेऱ्या होतील...

  १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २६ फेऱ्या होणार आहेत...

  १९४ महाड विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल लावण्यात येणार असून २९ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत...

  २६३  दापोली विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून २७ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत...तर २६४ गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून २३ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत...

टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र  मतमोजणी टेबल लावण्यात आलेले आहेत...

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती
मतमोजणीसाठी एकूण १ हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत...

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे...

मोबाईल नेण्यास मनाई

मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई

निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल... मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे...

 मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे... कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे... उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधीना क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल...

१०० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण  लोकसभा मतदारसंघामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी...

Post a Comment

Previous Post Next Post