सोगाव - अब्दुल सोगावकर :
सासवणे ग्रा.प.सदस्या संजना पाटील यांनी केले स्वागत,
भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी सात जणांच्या विदेशी मंडळाने ७ एप्रिल रोजी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग तालुक्यातील अनेक मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करत माहिती घेतली.
यावेळी सासवणे ग्रामपंचायत हद्दीतील कोळगाव येथील मतदान केंद्राला भेट दिली, या विदेशी प्रतिनिधी मंडळाने मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आलेल्या काही मतदारांसोबत व मतदान केंद्रातील निवडणूक अधिकारी यांच्यासोबत हस्तांदोलन करत गाईडच्या मध्यस्थीने संवाद साधून भारतीय निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांच्या सोबत संवाद साधत आपल्या भारतीय व त्यांच्या येथील निवडणूक प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याविषयी देखील माहिती घेतली. या विदेशी प्रतिनिधी मंडळातील आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम समितीमध्ये बांगलादेशचे महम्मद मोनिरदामन टी. आणि जी. एम. शाहताब उद्दीन (बांगलादेश निवडणूक आयोग अधिकारी), कझाकिस्तानचे नुरलान अब्दिरोव आणि आयबक झीकन (केंद्रीय निवडणूक आयोग, कझाकिस्तान), श्रीलंकेच्या सिलजा हिलक्का पासिलीना (संचालक, श्रीलंका) तसेच झिम्बाबेचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगुम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग,झिम्बाबे) यांचा समावेश होता...
फोटो लाईन : कोळगाव येथील मतदान केंद्रावर भेट देणाऱ्या विदेशी पाहुण्यांसोबत सासवणे ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील चर्चा करताना,
