महाराष्ट्र वेदभुमी

कॉपी पेस्टमुळे पत्रकारिता मोठी होणार नाही : अतुल कुलकर्णी...




श्रीवर्धन( प्रतिनिधी) 

रायगड प्रेस क्लबच्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श देशातील पत्रकारांनी घ्यावा : महेश म्हात्रे

पत्रकारांनी टाकलेल्या ठिणगीमुळे वणवा लागणार नाही याची दक्षता घ्या: खा. तटकरे.

लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्याचा आरसा दाखवत सामाजिक बांधिलकी जपणार: एस एम देशमुख

रायगड प्रेस क्लबचा १९ वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा श्रीवर्धन येथील समुद्र किनारा बीचवर मोठ्या उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाचे प्रश्न मांडत शासनाला व लोकप्रतिनिधींना त्यांच्या चांगल्या वाईट कामाचा आरसा दाखवत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करणाऱ्या रायगड प्रेस क्लबचा आदर्श देशातील पत्रकारांनी घ्यावा असे गौरवोदगार ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे यांनी काढले तर प्रमुख अतिथी लाभलेले रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अतुल म्हात्रे यांच्या भाषणातील पत्रकारांशी असलेल्या प्रेम व तिरस्काराच्या नात्याचा संदर्भ देत प्रेम असेल तर रागावण्याचा अधिकार असतो मात्र तिरस्कार वाढत गेला तर त्यातून टाकलेल्या ठिणगीतून वणवा पेटणार नाही याची देखिल काळजी पत्रकारांनी घ्यावी असे आवाहन सदरच्या कार्यक्रमांत केले तर कार्यक्रम अध्यक्ष एस एम देशमुख यांनी शासन व लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाचा आरसा दाखवत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकारांनी करत राहावे असे सांगितले...

यावेळी मंचावर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाभळे, खा.सुनिल तटकरे, महम्मद मेमन, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोणण विभागीय सचिव अनिल भोळे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, श्रीवर्धनचे माजी नगराध्यक्ष जीतेंद्र सातनाक, मुख्याधिकारी विराज लबडे,आदी मान्यवर उपस्थित होते...

सुरुवातीस आपल्या प्रास्ताविकामध्ये मनोज खांबे यांनी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून राबवलेले सामाजिक उपक्रम, विविध आंदोलने याची माहिती देत जंजिरा मुक्ती दिन शासन स्तरावर साजरा केला जावा अशी मागणी केली तसेच त्याबाबतचे निवेदन सरकारला दिले असल्याचे सांगीतले..


गेली अनेक वर्ष रायगड प्रेस क्लबच्या वतीने विविध स्तरांवर पुरस्कार प्रदान करण्यात येतात या अनुषंगाने यावर्षीचा आचार्य अत्रे राज्यस्तरिय संपादक पुरस्कार प्राप्त दै.लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी जाहीर कार्यक्रमात लोकप्रतिनिधी काय म्हणाले आणि त्यांनी पुढे काय सांगितले यातच आजचे पत्रकार अडकून पडणार आहेत का? असा सवाल करीत पत्रकारिता कशा प्रकारची असावी यासाठी प्रशिक्षणाची गरज असून त्यांनी पंढरपूर येथील पत्रकार, २६/११ ऑपरेशन मुंबईवर लिहीलेल्या एका वाक्यामुळे मधु चव्हाण यांची एका केसमधून झालेली सुटका अशी उदाहरणे देत पत्रकारांनी कॉपी पेस्टची पत्रकारिता न करता आपल्या अवतीभवती घडलेल्या घटनांचे वेगळेपण दाखवत त्याची दखल देशाला घ्यायला लावावी असा सल्ला दिला. राजकिय नेते जर पत्रकारांना गृहीत घरायला लागले तर तो पत्रकारितेचा पराभव असेल असे सांगत पत्रकारांचे राजकीय नेते व शासकिय अधिकाऱ्यांशी नेते हे प्रेम व तिरस्काराचे असते. पत्रकारांनी व्यक्तीवर न लिहीता व्यवस्थेवर लिहीले तर शत्रुत्वता येत नाही. व्यवस्थे विरोधात ठिणगी टाकत आपल्या लिखाणातून दबाव गट तयार करण्याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन केले..

खा. सुनिल तटकरे यांनी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करून सत्ताधाऱ्यांच्या चुका जरूर दाखवाव्यात मात्र हे करीत असताना चांगल्या कामाचेही कौतुक करावे. केवळ तिरस्कारातून विरोधात लिहीणे हा लोकप्रतिनिधींवर अन्याय असतो. एखाद्या पक्षाचे मुखपत्रातून विरोधकांवर होणारी टिका आपण समजु शकतो मात्र पत्रकाराने एखाद्याचे पे रोलवर काम करून तिरस्कार करू नये असे सांगात मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार श्रीवर्धनमध्ये आले आहेत त्यांच्या नजरेत आपण केलेले काम आले असेल तर नक्कीच चांगले लिहीतील असे सांगितले...

ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी मुंबईच्या खालोखाल गाजणारी संघटना म्हणून रायगड प्रेसचा गौरव करीत बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या वृत्तपत्राच्या दर्पण नावातूनच लोक प्रतिनिधी, शासनाला त्यांच्या कामाचा आरसा दाखवण्याचे काम केले तोच वारसा आपण पुढे ठेवला तर कुणाच्याही शाबासकीची पत्रकारांना गरज नाही, पत्रकारांच्या लिखाणातील ताकद, उर्मी वृद्धींगत होईल तेव्हा ते लिखाण लोकांपर्यत पोहचेल त्यासाठी तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करीत स्वतःला बदला आणि आपल्या लिखाणातून आपली ओळख निर्माण करा असे आवाहन केले.


आपल्या अध्यक्षीय भाषणात एस एम देशमुख यांनी पेण येथे पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येईल अशी घोषणा करीत यापुढे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मला न देताना शासनाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना द्यावे म्हणजे आपल्या मागण्या, सूचना त्यांना ऐकता येतील असे सांगत खासदार तटकरेंनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावर कोणतेही भाष्य न केल्या बद्दल नाराजी व्यक्त करीत कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नी बोलणार नाही त्यामुळे आपल्याला लिखाण आणि आंदोलनातून या प्रश्न धगधगता ठेवावा लागेल असे आवाहन केले.

सुरुवातीस मिलिंद अष्टीवकर यांनी पत्रकारांनी जनतेसाठी काम केले म्हणून ही गर्दी झाली असे सांगत प्रत्येकाने स्वावलंबी व्हायला हवे असे सांगितले...

शरद पाबळे यांनी चांगले उपक्रम राबवणारा रायगड प्रेस क्लब असून रायगड जिल्ह्याचा हा पॅटर्न सर्वानी राबवावा असे सांगितले तर किरण नाईक यांनी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकर करा अशी सुचना केली.तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार सन्मानित स्नेहल पाटकर यांनी कवितेच्या माध्यमातून स्त्री शक्तीला बळ देणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची महती सांगत त्यांच्यामुळेच हा पुरस्कार घेऊ शकले असे म्हटले...

यावेळी आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान दै. लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांना,  प्रेस क्लब जीवन गौरव सन्मान म्हसळ्याचे जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांना तसेच निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती जेष्ठ पत्रकारिता सन्मान अलिबाग - रेवदंड्याचे जेष्ठ पत्रकार अभय आपटे तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता सन्मान येथील न्यूज १८ लोकमतच्या स्नेहल पाटकर मुंबई( रोहा )यांना गौरवण्यात आले, रायगड प्रेस क्लबचे पुढील सन्मान पुरस्कार, प्रकाश काटतरे स्मृती निर्भीड पत्रकारिता सन्मान  अलिबागचे महेंद्र दुसार यांना, दीपक शिंदे स्मृती सिनिअर व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान  अलिबागचे मोहन जाधव यांना, अ‍ॅड. जनार्दन पाटील स्मृती,शोध पत्रकारिता सन्मान  कर्जतचे दीपक पाटील यांना, संतोष पवार स्मृती युवा पत्रकारिता सन्मान पुरस्कार खोपोलीचे काशिनाथ जाधव यांना, डॉ. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान पुरस्कार महाडचे इलियास ढोकले यांना,   प्रेस क्लब अ‍ॅक्टीव्ह  जर्नालिस्ट सन्मान  पुनम धुमाळ (माणगाव)यांना  ,प्रेस क्लब सामाजिक कार्यकर्ता सन्मान  पेणचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना तर  प्रेस क्लब विशेष सन्मान श्रीवर्धनचे जेष्ठ पत्रकार विजय गिरी यांना मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात  आले. तर रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सन्मान श्रीवर्धनचे संतोष रेळेकर आणि रोह्याचे रवींद्र कान्हेकर यांना,विशेष स्थानिक सन्मान म्हणून समाजसेवक सन्मान अली अब्दुल रज्जाक काझी यांना,कृषी सन्मान इप्तिकार शब्बीर चरफरे,उद्योजक महंमद हनीफ गफार मेमन,स्वच्छता दूत सन्मान विक्रम गायकवाड आणि दीपक धनवटे तर वृत्तपत्र वितरक सन्मान किशोर वाडिया आणि रुपेश तीताडे यांना देवून गौरविण्यात आले. ..

अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन आद्य पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन करण्यात आली तसेच सुत्रसंचलन महाडचे ज्येष्ठ पत्रकार संदीप जाधव व श्रीवर्धनच्या  सौ. पद्मजा  कुलकर्णी यांनी केले तसेच याची सांगता भोजनाने व समधुर गीत बहरदार गाण्याने उपस्थित मान्यवर तसेच पत्रकार मंडळी यांना मंत्र मुग्ध केले तर विविध गाण्यांच्या तालावर आनंद लुटला..

Post a Comment

Previous Post Next Post