महाराष्ट्र वेदभुमी

निविदा प्रक्रिया नसताना रस्त्याच्या कामाचे केले भुमिपूजन. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर भुमिपूजनाची घाई ;




Ki iiरोहा दि २४ फेब्रु. प्रतिनिधि ;- 

जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे शिवसेनेने केली तक्रार

रोहा शहरातील मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या एसटी बस स्थानका लगतच्या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे, या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षात लक्ष दिले नाही, निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया न करताच या रस्त्याच्या कामाचे घाईघाईने भुमिपूजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे, ही लोकांची फसवणूक असल्याचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाने याविषयावर रोहा मुख्याधिकारी यांची तक्रार जिल्हाधिकारी रायगड यांचेकडे केली आहे...

नगरपालिकेच्या निवडणूका झालेल्या नसल्याने सद्या रोहा नगर पालिकेत प्रशासक राजवट आहे. रोह्यातील अनेक वर्षे मजबूतीकरणाच्या प्रतिक्षेत असलेला वीर सावरकर रस्ता आणि धावीर प्लाझा सोसायटी अंतर्गत रस्ता, या कामांचे भूमीपूजन गुरुवारी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले, मात्र सदर कामांची निविदाप्रक्रियाच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कामाचे कार्यारंभ आदेश नसताना भुमिपूजन करून सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यात धुळ घातली गेली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भुमिपूजन करण्यात आले असल्याचे समोर आले आहे... 

वीर सावरकर रस्ता व्हावा म्हणून रोहेकरांची खुप वर्षांपासून मागणी आहे. हा रहदारीचा मुख्य रस्ता आहे, मात्र रोहा नगरपरिषद तसेच लोकप्रतिनिधिंनी यारस्त्याकडे दुर्लक्ष केले, पावसाळ्यात या रस्त्यावरून नागरिकांना चालणे मुश्किल होत असे, सोशल मीडियावर नागरिक वारंवार यारस्त्याच्या विषयावर ओरड करीत परंतु याची दखल घेतली गेली नाही, रोहा शहरात गेली पाच वर्षे फक्त सुशोभीकरण करण्याच्या कामांनाच प्राधान्य दिले गेले. ज्या कामांना प्रशासनाचा हिरवा कंदिल नाही अशा ठिकाणी केवळ भरगच्च कार्यक्रम करून श्रेय घेण्याची घाई रोह्यात होताना दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान प्रशासक राजवट असताना भूमिपूजन पाट्यांवर एकाच पक्षाच्या नगरसेवकांची नावे टाकण्याचा प्रकार समोर आल्याने रोह्याचे मुख्याधिकारी पंकज भुसे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत...

प्रतिक्रिया :-

प्रशासक तथा मुख्याधिकारी रोह्यात एका विशिष्ट पक्षाचा अजेंडा राबवताना दिसून येत आहेत. एकाच पक्षाच्या माजी नगरसेवकांची नावे भुमिपूजन पाट्यांवर टाकून त्यांचा प्रचार सुरू केला आहे. मंजुरी नसलेल्या कामांचे भुमिपूजन करुन मुख्याधिकारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याबाबत मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे.

 - समीर शेडगे, तालुकाप्रमुख, शिवसेना, ठाकरे गट


भूमिपूजन केलेल्या रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया झालेली नाही, ती सोमवारी होईल, कामाचे कार्यारंभ आदेशही दिलेले नाहीत, जिल्हा नियोजन मंडळातून या कामाला मंजुरी घेतली आहे, तसेच महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाची मान्यता आहे, भूमिपूजन पाट्यांवर टाकण्यात आलेल्या माजी नगरसेवकांची नावांबाबत माहिती घेऊन सांगतो.

 - पंकज भुसे, मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी, रोहा नगर परिषद

Post a Comment

Previous Post Next Post