रोहा, दि. ०१ डिसें. प्रतिनिधी :-
एमआयडीसीच्या सीईटीपी केंद्राची सखोल चौकशी करावी ; पश्चिम खोऱ्यातील शेतकऱ्यांची मागणी
रोहा येथिल धाटाव एमआयडीसीच्या कंपन्यांतील २२ लाख लिटर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट कुंडलिका नदीत सोडले जात आहे...दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदी काळवंडली असून पाण्याला काळा रंग येऊन मासे मृत्युमुखी पडले आहेत. या पाण्याला दुर्गंधी असल्याने जनावरेदेखील पाणी पित नाहीत...तसेच पिकेदेखील धोक्यात आली असल्याने रोहा एमआयडीसीच्या सीईटीपी केंद्राची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुंभोशी, गोफणसह कुंडलिका नदीच्या पश्चिम खोऱ्यातील गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे...
रोहा नगर पालिकेच्या सांडपाण्यानंतर आता एमआयडीसीचे रासायनिक सांडपाणी
रोहा नगर पालिकेच्या मैलामिश्रित सांडपाण्यानंतर आता एमआयडीसीच्या रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने कुंडलिकेच्या नशिबी आलेले भोग थांबण्याचे नाव घेत नाहीत... रोहा एमआयडीसी परिसरात ४१ रासायनिक कारखाने आहेत... सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून कुंडलिका नदीत सोडण्यासाठी गोफण बंदरापर्यंत टाकलेली पाइपलाइन कुंभोशी गावाजवळ नदीपात्रातच फुटली आहे...सदर पाइपलाइनमधून निघणारे केमिकलयुक्त घाण पाणी प्रक्रिया केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे...या दूषित पाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली असून हे पाणी काळे पडले आहे...रोहा एमआयडीसीत वारंवार तक्रार करूनही यावर कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे...या दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील विहिरी दूषित झाल्या असून शेतजमिनीचा पोत खराब झाला असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे...शेती नाही, रोजगार नाही अशा अवस्थेत जगायचं कसं, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.- कुंडलिका नदी बायोलॉजिकल डेड..! -
रोहा तालुक्याचे नैसर्गिक वैभव म्हणजे 'कुंडलिका' नदी... तिने संपूर्ण तालुक्याला आपल्या कवेत घेऊन काठावरील गावांना समृद्धी बहाल केली...काठावरील गावांना ऐतिहासिक, भौगोलिक वारसा दिला...असे असताना आज तिच्यात सोडल्या जाणाऱ्या रोहा नगर पालिका आणि धाटाव एमआयडीसीच्या प्रदूषित सांडपाण्याने नदीला अवकळा आली आहे... रोहा एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी बिनदिक्कतपणे कुंडलिका नदीत वाहत आहे... एकेकाळी जैवविविधतेने नटलेली कुंडलिका नदी रासायनिक प्रदूषणामुळे 'बायोलॉजिकली डेड' म्हणजेच 'जैविकदृष्ट्या मृत' झाली आहे...नदी वाचवण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची रोहा तालुक्यातील पर्यावरणप्रेमींची मागणी आहे...
प्रतिक्रिया ;-
पाईपलाइन कुंभोशी जवळ नदीपात्रात फुटल्यानंतर एमआयडीसी व रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनने तातडीने तिची दुरुस्ती करणे आवश्यक होते, तसेच दुरुस्ती होईपर्यंत सांडपाणी सोडणे बंद करायला हवे होते... परंतु तसे न करता प्रक्रिया न केलेले केमिकलयुक्त घाण पाणी सोडून कुंडलिका नदी प्रदूषित केली आहे. सीईटीपी केंद्रातुन सर्रासपणे प्रक्रिया न केलेले पाणी कुंडलिका नदीत सोडले जात असल्याचे याघटनेवरून सिद्ध झाले आहे, एमआयडीसीच्या सीईटीपी केंद्रावर सक्त कारवाई झाली पाहिजे..-नितिन परब, अध्यक्ष, रोहा सिटीझन फोरम
रोहा एमआयडीसीच्या सिईटीपी मधील रासायनिक सांडपाणी कुंडलिका नदी दूषित करत असल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे... गोफण जवळ रसायन सदृश्य पाणी आढळून आले, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे... कार्यवाहीबाबतीत वरिष्ठ अधिकारी लवकरच निर्णय घेतील.- राजेश आवटी, एस. आर. ओ. रायगड -२ महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ

