महाराष्ट्र वेदभुमी

निसर्गपूजक बळीराजाचे स्मरण करा, सर्वांची भरभराट होईल, कर्मकांडाला दूर ठेवा ; प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड

 


कोलाड (श्याम लोखंडे) 

बळीराजा फाउंडेशनच्या कृषी दिनदर्शिकेचे शानदार प्रकाशन

आपला खरा पूर्वज बळीराजाने कर्मकांडाला लाथाडले, शेतकरी देशातील रयतेला सुखी करण्यासाठी आदर्श राज्यकारभार केले, पण परकीय आर्याने घुसखोरी करून कर्मकांड, यज्ञ प्रथेला प्रारंभ केले. त्यांच्या आक्रमणापुढे निसर्गपूजा मागे पडली. यज्ञ कर्मकांडात राज्य बुडवण्याची वेळ महात्मा बळीराजावर आली. वामनाच्या त्याच तीन पावलांनी घात केला. स्वातंत्र्य, समता, सुख दूर गेले असे आपले आदर्श पूर्वज, निसर्गपूजक बळीराजाचे स्मरण केले पाहिजे, शेतकरी, कष्टकरी विद्यार्थ्यांना बळीराजाच्या गोष्टी सांगा, तरच बळीराजा फांऊडेशनचा वैचारिक पाया भक्कम होईल, विभागातील शेतकरी अधिक सुखी होईल, भरभराट होईल, सुजलाम् सुफलाम् होईल असे मौलिक विचार प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी व्यक्त केले. ते सलाम रायगड संपादित बळीराजा फाउंडेशनच्या कृषी दिनदर्शिका २०२४च्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.


महादेव मंदिर तळाघर येथे मंगळवारी आयोजित कृषी दिनदर्शिका २०२४चे प्रकाशन, प्रगतशील शेतकऱ्यांचा बळीराजा सन्मान कार्यक्रमाला प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, कोलाड पाटबंधारेचे उपकार्यकारी अभियंता अतुल आगरवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, उपविभागीय अभियंता एस एस महामुनी, कृषी अधिकारी सुतार, व्हीआरटीचे सुशील रुळेकर, शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, बळीराजा फांऊडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष तुकाराम भगत, माजी सरपंच सतिश भगत, अनिल भगत, संदेश मोरे, कृष्णा बामणे, व मान्यवर उपस्थित होते. कालव्याच्या पाण्यासाठी अविरत लढा देत शेतकऱ्यांच्या हितासाठी चळवळ उभी करण्याचा संकल्प केलेल्या बळीराजा फाउंडेशनच्या प्रथम कृषी दिनदर्शिकेचे शानदार प्रकाशन प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड व मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रत्येक पानावर कृषी विषयक माहिती, समर्पक सनावली, तितकेच आकर्षक रंगीत कॅलेंडर बळीराजाला भेट देण्यात आले. प्रास्ताविकात राजेंद्र जाधव यांनी विभागातील कृषी चळवळ व कालव्याच्या पाण्याबाबत माहिती दिली. सेंद्रिय शेतीवर अधिक भर देणार आहोत, शेतकरी गटाला अधिक गती देऊन विभाग सुजलाम् सुफलाम् करण्याचा संकल्प आहे. आपण सर्व प्रशासनाने सहकार्य करावे असे सांगत बळीराजा फांऊडेशनच्या कार्याची माहिती जाधव यांनी दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी अनंता मगर, युवा शेतकरी मेघेश भगत यांना बळीराजा सन्मान देवून गौरविण्यात आले. दुबईत जागतिक पर्यावरण विषयक परिषदेत प्रतिनिधित्व करता आले, हा आपणा सर्वांचा सन्मान आहे. वाडवडिलांनी केलेली पूर्वीची निकोप शेती आपण परत करू या, तरच सामाजिक आरोग्य टिकून राहील, हातात हात घालून काम करू असे व्हीआररटीचे सुशिल रेळेकर यांनी सांगितले.


भाषणात पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी प्रत्येक प्रांतातील शेती वेगवेगळी आहे. पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातील शेती व कोकणातील शेती वेगळी आहे. कोकणातील शेती कष्टप्राय आहे. माती वेगळी आहे. तेव्हा त्यांनी जमिनीत एवढा पिकवला, तेवढा पिकवला अशी स्पर्धा होता कामा नये. कोकणात जे पिकते, ते चांगले करायला करायला हवे, रोहा विभागातील शेतीत क्रांती घडेल असे मोठे नाव करा, कॅलेंडरमध्ये खूप उपयुक्त माहिती आहे, असे गौरवोद्गार वजा आवाहन बाबर यांनी केले. पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता एस एस महामुनी यांनी कालव्याच्या पाण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. कालव्याची कामे युद्ध पातळीवर सुरू आहे. महत्त्वाची कामे करून एप्रिल प्रारंभी पाणी सोडायचा आहे. असे स्पष्ट आश्वासन महामुनी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना देत विभागासाठी कालव्याच्या पाणी किती बिकर गरज आहे हे मान्य केले. प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी पश्चिम महाराष्ट्र व कोकणातल्या मातीचा स्वभाव सांगितला. बळीराजा फाउंडेशनने प्रगतशील शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक सन्मान केला, असे सांगत बळीराजाचा खरा इतिहास मुलांना, शेतकऱ्यांना सांगा तरच फाउंडेशनची विचारधारा मजबूत होईल असे अभ्यासू मत खुटवड यांनी व्यक्त करत वृद्धिजीवी व्यक्तिमत्व दाखवून दिले. तळाघर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. सूत्रसंचालन सचिव ऍड दीपक भगत यांनी केले, आभार प्रदर्शन कृष्णा बामणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष तुकाराम भगत, दीपक भगत, रुपेश साळवी, कृष्णा बामणे, संदेश मोरे, राकेश बामुगडे, नितेश बामुगडे, शिक्षक वृंद, शेतकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post