शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी मोठा दिलासा
लोकवर्गणीतून साकारला पांदण रस्ता
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- ग्रामीण भागांत शेतांना रस्ते नसल्याने हंगामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते... शासकीय योजना असूनही त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणात नसल्यानेही फारसा फायदा नाही. यामुळे येथील लोकसहभागातून वर्गणी करीत पांदण रस्ता तयार करण्याचे काम हातात घेतले आहे...
ग्रामपंचायत आजनी अंतर्गत आजनी मुख्य रस्ता ते दीपक दमाहे यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती... त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे, मशागतीसाठी यंत्रसामग्रीची ने-आण तसेच शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता... ही बाब लक्षात घेऊन सरपंच मनोज लिल्हारे यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले... मात्र पावसाळा तोंडावर आल्याने निधी मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी लोकसहभागातून पांदण रस्ता उभारण्याचा निर्णय घेतला... सरपंच मनोज लिल्हारे यांच्या पुढाकारातून गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लोकवर्गणी जमा करून पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात केली... मात्र रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे कामात अडथळे निर्माण झाले... याची गंभीर दखल घेत तहसीलदार रामटेक यांच्या सहकार्याने पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटविले... त्यानंतर रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले...
विकासकामे करण्याचा आदर्श: सरपंच लिल्हारे
लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या या पांदण रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीमालाची वाहतूक, मशागत, कृषी यंत्रांची ने-आण तसेच दैनंदिन शेतीकामे आता अधिक सुलभ झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे... या उपक्रमामुळे ग्रामपंचायत आजनीने लोकसहभागातून विकासकामे करण्याचा आदर्श निर्माण केला आहे. सरपंच मनोज लिल्हारे यांनी या कामासाठी आर्थिक, श्रमदान व विविध प्रकारे योगदान देणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आभार मानले... भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी अशीच एकजूट कायम ठेवून विकासकामे हाती घेण्याचा निर्धार व्यक्त केला...
