महाराष्ट्र वेदभुमी

बेळगाव सीमावादावर पाठपुरावा वाढवणार; खा. सुनील तटकरे यांची ठाम भूमिका

माणगाव : (नरेश पाटील): दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाच्या प्रश्नावर खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत हा मुद्दा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असून त्यावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. सोमवारी रात्री, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली...

सदर प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याच्या लवकर सुनावणीसाठी आणि निकालासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत असला तरी राज्य शासनाने त्याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्रकरणाची प्रभावी बाजू मांडण्यासाठी सक्षम व अनुभवी वकिलांची नियुक्ती करणे गरजेचे आहे,” असे तटकरे यांनी नमूद केले...

पुढे बोलताना ते म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सुनावणीच्या तारखा निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच या संवेदनशील प्रश्नावर सातत्यपूर्ण आणि ठोस पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले...

हा वाद महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांशी निगडित असल्याने केंद्र सरकारची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “राज्य व केंद्र या दोन्ही स्तरांवर समन्वय साधून या प्रश्नाला गती देण्यासाठी मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करेन,” असे ते म्हणाले...

दरम्यान, माणगाव नगर परिषद क्षेत्रात विविध लोकार्पण, भूमिपूजन आणि विकासकामांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित असताना आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी सुमारे सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमावादाबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post