रेवदंडा (ओमकार नागावकर) : रेवदंडा आणि आसपासच्या परिसरात आज सकाळपासून अचानक हवामानात मोठा बदल झाला... प्रचंड विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या सरींनी नागरिकांची अक्षरशः धावपळ उडवली... अनपेक्षितपणे आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले...
दरम्यान, बागमळा परिसरात पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या उंच ताडाच्या झाडावर वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली... वीज पडताच झाडाने तात्काळ पेट घेतला आणि काही क्षण परिसरात ठिणग्यांचा वर्षाव होत असल्याचे भीषण दृश्य पाहायला मिळाले... विशेष म्हणजे, मुसळधार पावसातही झाड काही काळ जळत राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले... घटनास्थळाजवळच CNG पंप असल्यामुळे संभाव्य धोका ओळखून परिसरात घबराट पसरली होती... सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही... मात्र, या प्रसंगाने स्थानिकांच्या मनात धास्ती निर्माण झाल्याचे दिसून आले...
या अवकाळी पावसाचा फटका विविध व्यावसायिक क्षेत्रांनाही बसला आहे... परिसरातील अनेक रिसॉर्टमधील विद्युत सजावटी पावसाच्या पाण्यामुळे निकामी झाल्या... तसेच, काही घरांवरील सुरू असलेल्या बांधकाम साहित्याचे नुकसान झाले. विशेषतः वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, भट्ट्यांमधील लाकूड व तयार विटा भिजल्याने उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे... याशिवाय, काही ठिकाणी सुरू असलेल्या लग्नसमारंभांनाही पावसाचा फटका बसला... मंडप भिजल्यामुळे पाहुण्यांची गैरसोय झाली आणि आयोजकांची धावपळ उडाली...
दरम्यान, या पावसामुळे वातावरणात तात्पुरती गारवा निर्माण झाला असला, तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे... पुढील काही तासांत हवामानात बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
