कोलाड (श्याम लोखंडे): ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना निरोगी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने, नुकतेच 'माधवबाग' येथे एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते... 'ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थे'च्या पुढाकाराने आयोजित या शिबिराला खांब परिसरातील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला...
शनिवारी २८ मार्च रोजी या शिबिरात एकूण ३० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली... या उपक्रमांतर्गत माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपस्थित सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली... यात प्रामुख्याने रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारांशी संबंधित प्राथमिक तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले...
आजच्या धावपळीच्या युगात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यांना योग्य वेळी आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी आपला दिनक्रम कसा ठेवावा, यावर या शिबिरात सविस्तर चर्चा करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याबद्दल मौल्यवान टिप्स दिल्या...
ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, "आमच्या संस्थेचे नेहमीच हे ध्येय असते की, ज्येष्ठांना सक्षम आणि आरोग्यदायी जीवन जगता यावे... या शिबिरामुळे अनेक सदस्यांना आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याची प्रेरणा मिळाली आहे..."
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची विनंती संस्थेकडे केली आहे...
