महाराष्ट्र वेदभुमी

अचानक गडगडाट हलक्या सरी; कडक उकाड्यात दिलासा,

काही मिनिटे वीजपुरवठा खंडित

माणगाव :- (नरेश पाटील): शहरात शुक्रवारी रात्री (दि. २७ मार्च २०२६) अचानक हवामानात लक्षणीय बदल होत गडगडाटासह हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली...रात्री सुमारे ९:३६ वाजता आकाशात जोरदार गडगडाट झाला, ज्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले... त्यानंतर काही वेळातच पुन्हा सौम्य गडगडाटही ऐकू आला...

 यानंतर ९:३९ वाजण्याच्या सुमारास हलक्या सरींना सुरुवात झाली. मंद वाऱ्याच्या झुळुकींसह आलेल्या या सरींमुळे वातावरणात ताजेपणा जाणवू लागला... विशेष म्हणजे ९:४१ वाजता ‘पाऊस आला!’ अशा आनंदी आरोळ्यांनी परिसर दुमदुमला, तर मुलांनीही पावसाचा मनमुराद आनंद घेतल्याचे चित्र दिसून आले...

  दरम्यान, या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ९:४४ वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला... मात्र, नागरिकांना फारशी गैरसोय होऊ न देता अवघ्या काही मिनिटांतच, म्हणजे ९:४७ वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला...

  गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सुमारे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असून प्रचंड उकाडा, कडक ऊन व असह्य उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते... अशा परिस्थितीत आलेल्या या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण करत नागरिकांना काहीसा दिलासा दिला...

 दरम्यान,कोकण परिसरातील इतर काही भागांतही पावसाच्या सरींची नोंद होत असल्याची माहिती मिळत आहे... तसेच भारतीय हवामान विभाग (मुंबई केंद्र) यांनीदेखील येत्या ३० व ३१ मार्च रोजी कोकण किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे...

   एकूणच,उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी ही अनपेक्षित पावसाची सर अल्पकाळाची असली तरी दिलासा देणारी ठरली...

Post a Comment

Previous Post Next Post