माणगाव : (नरेश पाटील): नगर पं. अंतर्गत येणाऱ्या शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत गेल्या काही दिवसांपासून गंभीर अनियमितता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे... नियोजित वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट सूचना न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे...
काही दिवसापूर्वी देखभालीच्या कारणास्तव दोन दिवस पुरवठा बंद ठेवण्यात आले होते... त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा नियमित झाल्यासारखा वाटला, मात्र लवकरच वेळांमध्ये सतत बदल दिसून येऊ लागले. कधी अर्धा तास उशिरा, कधी चाळीस मिनिटे उशिरा, तर कधी पाण्याचा दाब कमी — अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत... काही वेळा पुरवठा जास्त वेळ चालू ठेवला जातो, तर कधी अचानक बंद केला जातो...
रविवारी दि. 22 रोजी पाणीपुरवठा तब्बल एक तास उशिरा करण्यात आला. त्यानंतर आज सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी नेहमीच्या सकाळी ६:१५ वाजताच्या वेळेस पाणीपुरवठा झालाच नाही...
यादरम्यान कोणतीही पूर्वसूचना किंवा तांत्रिक अडचणीबाबत माहिती न देता, पहाटेच्या सुमारास पाणी सोडण्यात आल्याचे समोर आले... त्यावेळी बहुतांश नागरिक झोपेत असल्याने, अनेकांच्या घरांमध्ये पाणी ओसंडून वाहिल्याचे दिसून आले....
दरम्यानाचा काळात ज्यांनी टाक्यांना नळ थेट जोडून ठेवले होते, त्यांच्या टाक्या भरून पाणी ओसंडून बाहेर पडले. काही ठिकाणी पाण्याचा उलटा प्रवाह (रिव्हर्स फ्लो) होऊन टाक्यांमधील पाणी परत पाइपमधून निघून गेल्याचेही प्रकार घडले... परिणामी, नागरिकांचे पाणी वाया गेले आणि पुन्हा पाणी भरण्याची चिंता निर्माण झाली...
दरम्यान, काही स्थानिक व्हॉट्सअॅप गटांमध्ये शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांमधून मोठ्या गळतीमुळे पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल होणार असल्याची माहिती पुढे आली... मात्र, जर गळतीमुळे वेळेत बदल अपेक्षित होता, तर त्याच दिवशी पहाटेच पाणीपुरवठा कसा करण्यात आला? — असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत... या विसंगतीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे...
परिसरात विविध चर्चा रंगताना दिसल्या. “पाणी नक्की कधी येणार?” — या प्रश्नाचे ठोस उत्तर कुणाकडेच नव्हते... काही जणांनी सकाळी १० वाजता, तर काहींनी ११ वाजता पाणी येईल, असा अंदाज व्यक्त केला... मात्र अधिकृत माहितीचा पूर्ण अभाव असल्याने संभ्रम अधिकच वाढला...
या दरम्यान एका वयोवृद्ध महिलेमध्ये झालेल्या संवादातूनही परिस्थितीची तीव्रता दिसून आली... “ तुमची टाकी कशी रिकामी झाली?” या प्रश्नावर शेजाऱ्यांनी दिलेले उत्तर — “टाकीतील पाइप मधून, त्यामुळे पाणी परत गेले,” — हे तांत्रिक त्रुटी आणि जागरूकतेच्या अभावाचे उदाहरण ठरले...
काही ठिकाणी पाइपमधील गळतीमुळे खाली ठेवलेल्या भांड्यांमध्ये पाणी साचलेले दिसले, तर काही घरांच्या अंगणात पाणी सांडल्याचे स्पष्ट चिन्ह दिसून आले... यावरून पहाटेच पाणीपुरवठा झाल्याचे संकेत मिळतात...
दरम्यान, सर्वांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा करण्यात आला... मात्र तोपर्यंत नागरिकांमध्ये संभ्रम, त्रास आणि नाराजी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती...
एकूणच, “पाणी आले, पण वेळ चुकीची; पाणी भरले, पण टिकले नाही; पाणी गेले, पण माहिती मिळाली नाही” — अशी परिस्थिती निर्माण झाली आहे... त्यामुळे नागरिकांकडून एकच मागणी पुढे येत आहे — पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे आणि कोणतीही अडचण असल्यास तत्काळ सूचना द्यावी...
सद्यस्थितीत मात्र सर्वांच्या मनात एकच प्रश्न घोळतो आहे — “पाणी नेमके कधी येणार?”
