७५ वर्षांत १९ उत्पादन केंद्रांसह १२० देशांत विश्वासार्ह सेवा; शाश्वत विकासासाठी सामाजिक कार्यातही पुढाकार..
कोलाड (श्याम लोखंडे): रंगद्रव्य उत्पादनांत अग्रेसर असलेल्या सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपला अमृत महोत्सव साजरा करतानाच जागतिक भरारी घेतली आहे... ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करताना जर्मनीस्थित ह्युबॅक ग्रुपचे अधिगृहण करताना १२० पेक्षा अधिक देशांत रंगद्रव्य उत्पादनांची सेवा देणारी सुदर्शन केमिकल एकात्मिक जागतिक कंपनी बनली आहे... 'वन सुदर्शन' या संकल्पनेंतर्गत विविध घटक, तंत्रज्ञान आणि संस्कृतींना एकत्र आणून सातत्यपूर्ण, उच्च कार्यक्षम व शाश्वत रंग उपाय देण्यावर कंपनीचा भर आहे...
पुण्यात १९५१ मध्ये स्थापन झालेल्या सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या ७५ वर्षात विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख सेवा देत रायगड जिल्ह्यातील रोहा व महाडसह जगभरात १९ उत्पादन केंद्र, १२० देशांत रंगद्रव्यांचा पुरवठा व हजारो कर्मचाऱ्यांना रोजगाराची संधी दिली आहे. गेल्या सात दशकांत सुदर्शनने कोटिंग्स, प्लास्टिक्स, शाई, सौंदर्यप्रसाधने आणि विशेष अनुप्रयोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगद्रव्य क्षेत्रात विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून ओळख निर्माण केली आहे...
सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ग्लोबल चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठी म्हणाले, "७५ वर्षांचा प्रवास साजरा करताना आनंदाची भावना आहे. कंपनीच्या सुरुवातीपासून साधेपणा, काटेकोर अंमलबजावणी, ग्राहक व नियामक मानकांचे पालन आणि शाश्वत उत्पादन यावर भर देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील रोहा आणि महाड येथील उत्पादन प्रकल्पांनी या मूल्यांना बळकटी दिली असून, कंपनीच्या कार्यक्षमतेत आणि सामाजिक सहभागात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. 'सुदर्शन'ने मार्च २०२५ मध्ये जर्मनीस्थित ह्युबॅक ग्रुपचे अधिग्रहण केले. 'सुदर्शन'च्या प्रवासातील हा महत्वाचा टप्पा असून, यामुळे सुदर्शनची तांत्रिक क्षमता, उत्पादनाची व्यापकता आणि जागतिक स्तरावर अस्तित्व वाढले आहे."
“पुणे, रोहा आणि महाड येथे 'सुदर्शन'चा पाया आहे. मूल्यांवर आधारित आणि जबाबदारीची संस्कृती जोपासल्याने आम्हाला जागतिक स्तरावर अधिक मजबूत होता आले. ७५ वर्षांच्या या प्रवासातील मूल्यांना पुढे घेऊन जात औद्योगिक वाढीसोबतच शाश्वतता, सुरक्षितता आणि समाजविकासावरही आमचा भर राहील. आगामी काळात जागतिक ओळख अधिक मजबूत करत ग्राहक, कर्मचारी आणि समाजासोबत प्रगती साधण्याला प्राधान्य असणार आहे," असे त्यांनी नमूद केले.
