मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा
प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक : लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या पत्रकारितेच्या मोलाच्या योगदानाला ऊर्जा देत रामटेक नगरपरिषदेच्यावतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला... समाजातील वास्तव मांडणारी, अन्यायाला वाचा फोडणारी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणारी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे मत यावेळी नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी व्यक्त केले... या सन्मान सोहळ्याचे नियोजन व आयोजन नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत तसेच सर्व नगरसेवकांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले... नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामे, नागरी समस्या, जनतेच्या अडचणी तसेच प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार बांधव अहोरात्र कार्य करीत असल्याबद्दल यावेळी विशेष गौरव करण्यात आला... सत्य, पारदर्शकता व लोकहित जपण्यासाठी आपल्या लेखणीद्वारे पत्रकार समाजात जागृती निर्माण करीत असतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत, पत्रकार दिनानिमित्त रामटेक तालुक्यातील सर्व पत्रकार संघातील पत्रकारांचा डायरी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला... या सन्मानामुळे पत्रकार बांधवांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, नगरसेवक सुमित कोठारी, विश्वास पाटील यांच्यासह सर्व नगरपरिषद कर्मचारी तसेच रामटेक तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते...
