महाराष्ट्र वेदभुमी

किल्ला परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवा

३०० मीटर परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश

प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक:- तालुक्यातील ऐतिहासिक नगरधन येथील प्रसिद्ध वाकाटककालीन किल्ला (सर्व्हे क्र. १०९९) परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे... तहसिलदार रामटेक रमेश कोळपे यांनी ग्रामपंचायत नगरधनचे सरपंच व सचिव यांना दिलेल्या पत्राद्वारे किल्ल्याच्या ३०० मीटर संरक्षित परिसरातील सर्व अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत... या संदर्भात कार्यालयीन प्रकरण क्र. रा.मा.क्र./आर. टी. एस- ५९ /२०२४ -२०२५ तसेच मा. सहाय्यक संचालक (पुरातत्व), नागपूर विभाग, नागपूर यांचे पत्र जा.क्र./तंत्र/२०२५/७४९ (दि.१८)ऑक्टोबर २०२५ यांचा आलेल्या पत्राचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे... सदर किल्ला राज्य संरक्षित स्मारक असून, त्याच्या ३०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची पूर्वपरवानगी अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे... तसेच महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये स्मारकाचे संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याचेही स्पष्ट नमुद करण्यात आले आहे... किल्ल्याच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य व ऐतिहासिक रम्यता अबाधित राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश मा. सहाय्यक संचालक (पुरातत्व), नागपूर विभाग यांनी ग्रामपंचायतीस दिले आहेत... दरम्यान, किल्ल्याच्या रक्षणासाठी सुमारे २००० वर्षे जुने बुरुज आजही गावातील वॉर्ड क्रमांक ४, साई मंदिर परिसरात अस्तित्वात आहेत... मात्र वाढत्या अतिक्रमणामुळे हा मौल्यवान ऐतिहासिक वारसा गंभीर धोक्यात आला आहे... यासंदर्भात लोकमतने २२ जून २०२५ रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते... त्यानंतर आता कारवाईचे आदेश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे...

सूचना फलक लावण्याचा निर्णय

तहसीलदारांच्या पत्रानुसार ग्रामपंचायत नगरधनच्या २४ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत ठराव मंजूर करण्यात आला... किल्ल्याच्या समोरील जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये यासाठी सूचना फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा बाताबाकोडे यांनी दिली..

Post a Comment

Previous Post Next Post