महाराष्ट्र वेदभुमी

निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे माणगाव पोलिसांचे आवाहन

माणगाव :- (नरेश पाटील): रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, कायदेशीर चौकटीत व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी मा. जिल्हाधिकारी, रायगड यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत...

या पार्श्वभूमीवर माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती बोराडे यांनी हद्दीतील सर्व नागरिक, मतदार व उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना जारी करत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे...

निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर, भडकावू किंवा तणाव निर्माण करणारे वर्तन सहन केले जाणार नसून असे प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे...

तसेच WhatsApp, Facebook, Instagram, YouTube आदी सोशल मीडिया माध्यमांचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे... जात, धर्म, पंथ वा वर्गद्वेष निर्माण करणारे संदेश, पोस्ट, व्हिडिओ, रील्स वा स्टेटस टाकण्यास सक्त मनाई असून चुकीची माहिती, अफवा व दिशाभूल करणारी सामग्री प्रसारित करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता, आयटी कायदा व निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे...

निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असून ती अधिक बळकट करण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता, सुव्यवस्था व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडावे, असेही त्यांनी नमूद केले आहे...

उमेदवारांनी कोणतीही सभा, वाहनफेरी, मोर्चा किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असून परवानगीशिवाय प्रचार साहित्य लावणे किंवा वाटप केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे...

आचारसंहिता किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास अटक, दंड, तुरुंगवास यांसारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल... तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, निदर्शने, आंदोलन किंवा उपोषण करण्यास मनाई करण्यात आली आहे...

अखेर, सर्व नागरिकांनी कोणत्याही दबावाखाली न येता निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा व शांततेचे वातावरण राखावे, असे आवाहन माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती बोराडे यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post