महाराष्ट्र वेदभुमी

विलास सुर्वें यांची प्रशासनावर झोड खड्ड्यांनी व्यापलेला रेल्वे क्रॉसिंग रस्ता

रायगड :- (नरेश पाटील): माणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास सुर्वे यांनी कोलाड–भिरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग परिसरातील अत्यंत खराब रस्त्याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीमार्फत आक्रमक मागणी नोंदवली आहे.

सदर रस्ता रेल्वे खात्याच्या अखत्यारीत येत असून, गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता दुरवस्थेत आला आहे... परिणामी, वाहनचालक आणि प्रवासी वर्गाला प्रचंड गैरसोय भासत आहे. काही ठिकाणी रस्ता इतका खचला आहे की, वाहनं चालविताना ती अक्षरशः वरखाली होत असल्याने प्रवासी वर्ग हैराणच हैराण झाला आहे...

हा मार्ग सुतारवाडी (मा. खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांचे गाव) तसेच पुणे राज्य महामार्गाशी जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. याच मार्गाने विले भगड MIDC परिसर गाठता येतो, जिथे POSCO Maharashtra Steel Company सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योगसंस्था कार्यरत आहेत...

या रस्त्यावरून दररोज जड स्टील कॉईल वाहतूक करणारे ट्रक, स्थानिक वाहने, पर्यटकांची वाहने, तसेच पुणे–नागोठणे महामार्गाकडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र, प्रचंड खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मान–पाठदुखीचे त्रास होत असून, अपघाताचा धोका सुद्धा वाढला आहे...

या गंभीर स्थितीकडे तातडीने लक्ष देऊन कोलाड रेल्वे प्रशासनाने अथवा कोंकण रेल्वे विभागाने आवश्यक दुरुस्तीचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी मागणी विलास सुर्वे यांनी केली आहे... त्यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ सोयीचा नसून सार्वजनिक सुरक्षेशी निगडित आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक आहे...

Post a Comment

Previous Post Next Post