महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव नगरपंचायतीच्या आदिवासी शेतकऱ्यांवरील अन्यायामुळे जिल्हाधिकारी जावळे संतप्त

 

माणगाव :- (नरेश पाटील): रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी रात्री दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी माणगावात आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत माणगाव नगरपंचायतीला थेट इशारा दिला... “जर आदिवासींना भाज्या विकताना रोखले, पिटाळले तर मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असे ते म्हणाले... “माणगाव शहरातील फेरीवाल्यांना परवानगी देऊन त्यांच्याकडून पावती घेऊन कर वसूल केला जातो, पण जंगल व दुर्गम भागातून कष्ट करून आलेल्या आदिवासींना बाजारात विक्रीची संधी न देणे हे अन्यायकारक आहे आणि लाजिरवाणे आहे,” अशा शब्दांत त्यांनी नागरी यंत्रणेच्या दुटप्पी कारभारावर तीव्र टीका केली...

कर्जत तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी सेंद्रिय भाजीपाला पिकवला तरी विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याचे समजल्यावर जावळे यांनी तत्काळ एस.टी. बसची वाहतूक सोय करून दिली. “आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांना थेट कर्जत बाजारात पोहोचवण्यात आले आहे,” असे सांगताना त्यांचा आदिवासी बांधवांवरील आत्मीयतेचा प्रत्यय आला. “खरे घाम गाळणारे शेतकरी जर अपमानास्पद वागणूक सहन करत असतील तर ते प्रशासनासाठी लज्जास्पद आहे,” असे ते म्हणाले...

या कार्यक्रमात ‘सर्व विकास दीप’ संस्थेने अनेक मागण्या मांडल्या, मात्र जावळे यांनी सरकारी यंत्रणांच्या अनुपस्थितीवर रोष व्यक्त केला. “आज मी येथे आहे पण कृषी, वन, प्रांत, तहसील, बी.डी.ओ. अशा कोणत्याही खात्याचा अधिकारी येथे नाही. जर माझ्या येण्याची कल्पना दिली असती, तर तुमचे प्रश्न आजच सुटले असते. प्रशासनाशी सातत्याने नेटवर्क तयार करून दडपण आणले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. “किमान कृषी खात्याने तरी येथे उपस्थित राहायला हवे होते. पण दुर्दैवाने एकही सरकारी प्रतिनिधी नाही,” असे त्यांनी दुःखाने नमूद केले...

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकाऱ्यां सोबत एसबीआय बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक  विलास शिंदे, माणगाव शाखेचे व्यवस्थापक सुशील भस्मे, एमआयडीसी नियोजन सदस्य लक्ष्मण जाधव, ‘स्वराज्य’ संस्था आणि ‘सर्व विकास दीप ट्रस्ट’चे पदाधिकारी उपस्थित होते. एसबीआय बँकेच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत ही सामाजिक उपक्रमाची बैठक पार पडली. हिरवळ टिकवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षवाटप उपक्रमाचा कणा जाधव यांनी उभारला होते...

Post a Comment

Previous Post Next Post