महाराष्ट्र वेदभुमी

“कचरा गाडी आली हो!” - माणगावात कचरा संकलनातील अनियमिततेमुळे नागरिकांची चिंता


माणगाव :- (नरेश पाटील) :“कचरा गाडी आली हो, कचरा गाडी आली…” असा आवाज महिलांनी एकमेकींना देत घराघरांतून तीन दिवस साचलेला कचरा खाली आणण्याचे सांगितले... तीन दिवसांनंतर अखेर कचरा गाडी आल्याने नागरिकांना दिलासा तर मिळाला, पण त्याचबरोबर असंतोषाचाही सूर उमटला...

कचरा गाडीची स्वच्छतेची गाणी वॉर्ड क्र. 16 खांदाड येते कानावर पडताच अनेकांनी सांगितले की, मागील दोन दिवस कचरा उचलणारी गाडी आलेली नव्हती... या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी ती आल्याचे दिसले. दरम्यान, माणगाव नगरपंचायतीची घंटा गाडी न दिसता मिनी ट्रॅक्टर-ट्रॉली आली होती... विशेष म्हणजे नियमित चालक हा यावेळी गाडी हाकत नव्हता; तो मदतनीसाच्या भूमिकेत होता तर नवा चालक गाडी चालवत असल्याचे आढळले...

या प्रकारामुळे एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला – माणगाव नगरपंचायतीकडे कचरा संकलनासाठी पुरेशी वाहने नसल्याचे चित्र दिसते... अशावेळी विभागाने राखीव वाहने ठेवणे गरजेचे आहे... कारण कचरा संकलनातील विलंबामुळे केवळ गैरसोयच होत नाही, तर तो आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करू शकतो...

नागरिकांच्या स्मरणात नोव्हेंबर २०२४ च्या मध्यापासून ते २८ मार्च २०२५ पर्यंतचा काळ पुन्हा उजळला... त्या काळात कचरा गाडी पाच दिवस उशिरा येण्याच्या घटना घडल्या होत्या... सातत्याने लेखन आणि तक्रारीनंतर गेल्या सहा महिन्यांत सेवा सुधारली होती, आणि केवळ एखाद्या दिवशीच कधी उशीर होत होता. मात्र, गेल्या तीन दिवसांचा हा खंड पुन्हा जुन्या आठवणी ताज्या करणारा ठरला....

नागरिकांनी कळवूनही – व्हॉट्सअ‍ॅप संदेश वा फोनवरून माहिती दिल्यानंतरही – संबंधित विभागाने वेळेत दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त केली. विशेषतः महिलांना या काळात घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करणे कठीण गेले... गाडी अखेर आली तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत “कित्येक दिवस गाडी का आली नाही?” असा सवाल केला...

दरम्यान, स्वच्छता कर्मचारी मात्र नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन करताना दिसले... तथापि, नागरिकांचे मत स्पष्ट आहे – कचरा संकलन ही केवळ नियमित सेवा नाही तर आरोग्याशी निगडित सुविधा आहे... त्यामुळे या सेवेत होणारी कुठलीही ढिलाई नागरिकांना परवडणारी नाही, लोक आता जागरूक झाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post