महाराष्ट्र वेदभुमी

"सेविकांच्या ममतेने गुंतलेले जिवती व्रत : एका 'अशक्य' बाळाचा चमत्कारिक प्रवास!"

अलिबाग (ओमकार नागावकर) : वात्सल्य ट्रस्ट आईच्या ममतेचा साज चढवणारे जिवती व्रत दरवर्षी साजरे केले जाते, मात्र यंदा अलिबागमधील वात्सल्य ट्रस्टमध्ये साजरे झालेले जिवती व्रत सामाजिक ममतेचे अनोखे उदाहरण ठरले... एका बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त घडलेला हा क्षण केवळ भावनिक नव्हे, तर माणुसकीच्या सर्वोच्च उंचीचे दर्शन घडवणारा ठरला...

जन्मतःच डॉक्टरांनी केवळ ‘एक तासाचं’ आयुष्य दिलेल्या एका अर्भकाला ट्रस्टच्या सेविकांनी आशेने, श्रद्धेने आणि अथक प्रयत्नांनी नवजीवन दिलं... सुरुवातीला खाजगी रुग्णालयातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित झालेल्या या बाळाला तिथेही नाकारण्यात आलं...मात्र ट्रस्टच्या प्रकल्प प्रमुख सौ. शोभा जोशी आणि सामाजिक कार्यकर्त्या पूजा सुतार यांच्या प्रयत्नांतून बाळाला शेवटी उपचार मिळाले...

२१ दिवसांचा जीवनमरणाचा संघर्ष...

रात्रंदिवस जागरण, केवळ सिरिंजमधून १ मि.ली. दूध आणि प्रत्येक क्षणाला अनिश्चिततेचा सामना करत सेविकांनी बाळासाठी झुंज दिली... “Earlier the better” अशी डॉक्टरांची टिप्पणी जणू अंतिम घोषणा वाटत होती... पण सेविकांची श्रद्धा आणि जिद्द अखेर फळाला आली...

आज तेच बाळ रांगतंय, उभं राहायला शिकतंय आणि त्याचा वाढदिवस संपूर्ण ट्रस्टकडून आनंदाने साजरा करण्यात आला... सेविकांनी एकत्र येऊन केक आणला, जेवण तयार केलं आणि तो क्षण अजरामर केला...

जिवती व्रताचा आधुनिक अविष्कार...

आई आपल्या मुलासाठी व्रत करते, नवस करते हे आपण पाहतो... पण वात्सल्य ट्रस्टमधील सेविकांनी ‘दुसऱ्याच्या’ बाळासाठी जिवती व्रत केलं... हाच आधुनिक काळातला खरा ‘जिवती व्रताचा’ अर्थ आहे – जिथे सेवा हीच पूजा आहे...

वात्सल्य ट्रस्ट, अलिबाग – जिथे माणुसकी आणि ममता यांचं खरं रूप जपलं जातं...

Post a Comment

Previous Post Next Post