महाराष्ट्र वेदभुमी

लोकनेत्यांनी दिलेली डेडलाईन संपली..! मुंबई-गोवा महामार्गांवर दिशादर्शक फलकाजवळ जीवघेणे खड्डे,

खड्डे तरी भरा..! महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल?  प्रवाशी वर्गाची संतप्त प्रतिक्रिया 

 पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर)

  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.त्या सर्वच ठिकाणी एका बाजूकडून दुसऱ्या बाजुकडे जाणाऱ्या सर्वच दिशादर्शक फलकाजवळ मोठं मोठे खड्डे पडले असुन यामुळे प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या जुन २०२५ अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी दिलेली डेडलाईन पुन्हा एकदा फेल ठरली आहे.यामुळे महामार्गाचे काम होईल तेव्हा होईल? महामार्गावर पडलेले मोठं मोठे खड्डे तरी पूर्ण भरा अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे...

मुंबई-गोवा महामार्गांवरील चौपदरी करणाच्या कामाची परिस्थिती पाहता एक ना धड,भराभर चिंध्या अशीच झाली आहे.कारण या मार्गांवरील चौपदरी करणाच्या कामाला १८ वर्षे पूर्ण झाली तरी हे काम अद्याप ही पूर्ण झाले नाही.या मार्गांवरील उड्डाण पुल,गटार, साईड पट्ट्या,पुलांचे कठडे,मुंबई गोवा महामार्गावरून खेडेगावात जाणारे रस्ते, ही सर्वच कामे अर्धवट स्थितीत आहेत.याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे...

    मुंबई-गोवा महामार्गवरील रस्त्याची अक्षरशः चालन झाली आहे.या शिवाय या मार्गांवरील सर्वच दिशादर्शक फलका जवळ एका बाजु कडून दुसऱ्या बाजूकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना तर या मार्गांवरून प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या मार्गांची पाहणी केली असता या मार्गांवरील माणगाव,इंदापूर,तळवली,कोलाड,गोवे स्टॉप, पुई स्टॉप,खांब, सुकेळी, नागोठणे,यासर्वच दिशादर्शक फलका जवळ रस्त्याची भयानक अवस्था झाली असुन या ठिकाणी एखाद्या प्रवाशाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे...

   लोकनेत्यांकडून २०१८ पासुन आज पर्यंत अनेक डेडलाईन देण्यात आल्या.किती ठेकेदार आले आणि किती गेले याचा पत्ताच नाही परंतु महामार्गाचे काम पूर्ण होईना? या महामार्गांवर अपूर्ण रस्त्यामुळे होणारे मोठं मोठे अपघात टाळण्यासाठी हा महामार्ग चौपदरीकरण व्हावे यासाठी पत्रकार संघटना, विविध सामाजिक संघटना यांनी आंदोलन करून रस्तारोको केला.या महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली व कामाला सुरुवात झाली परंतु याला १८ वर्षे झाली तरी या महामार्गाचे काम पूर्ण होईना?

   प्रतिक्रिया 

 मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी लोकनेत्याकडून अनेक डेडलाईन देण्यात आल्या.तर  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम जुन २०२५ पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले होते.परंतु जुन महिना संपत आला तरी हे काम पूर्ण होणे राहिले दूरच प्रचंड पडलेल्या पावसामुळे या महामार्गाला खड्डयाचे साम्राज्य पसरले असुन आता कोकणी माणसांचा अंत पाहु नका ! टोल नाका सुरु करण्याआधी रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा कोकणी माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय तुमचे डोळे उघडणार नाही- चंद्रकांत लोखंडे,झुंजार शिवसैनिक

Post a Comment

Previous Post Next Post