महाराष्ट्र वेदभुमी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सायकल रॅली २१ मार्च रोजी कोकणात;

जागोजागी स्वागताची तयारी

पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर): केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) आपल्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सुरक्षित तट - समृद्ध भारत’ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव सायकल मोहिमेचे अर्थात सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.  केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते ७ मार्च रोजी आभासी पद्धतीने या मोहीमेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.गुजरात मधून या सायकल रॅलीला सुरुवात झाली असून २१ मार्च रोजी रॅली कोकणातील लोणेरे येथे दाखल होईल व पुढे दापोली,दाभोळ होऊन २२ मार्च रोजी रत्नागिरीत या रॅलीचे आगमन होणार आहे.कोकणात जागोजागी रॅलीचे जोरदार स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे.

 या मोहिमेत सहभागी झालेले सायकलपटू देशाच्या ६५५३ कि.मी. लांबीच्या किनारपट्टीलगत सायकलने प्रवास करतील. या सायकलपटूंना दोन पथकांमध्ये विभागले गेले असून, ती एकाच वेळी पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या कच्छ इथल्या लखपत किल्ला आणि पूर्व किनारपट्टीवर पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणामधील बखाली, इथून त्यांनी प्रस्थान केले आहे. ही दोन्ही पथके  २५ दिवसांच्या साहसी प्रवासानंतर ३१मार्च २०२५ रोजी  तमीळनाडूत कन्याकुमारी स्मारकाजवळ एकत्र येतील...

या मोहिमेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे १२५ कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामध्ये १४ धाडसी महिला सायकलपटूंचाही समावेश आहे. या मोहिमेसाठी या  सर्व सायकलपटूंना एका महिन्याचे कठोर प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणात लांब पल्ल्याची सायकलिंग  पोषण, सहनशिलता, सुरक्षितता या पैलुंवर विशेष भर दिला गेला आहे...

    सागरी सुरक्षेबाबत जनजागृती – किनारी प्रदेशातील नागरिकांना अमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी यांसारख्या संभाव्य धोक्यांबाबत जागरूक करणे.सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, यादृष्टीने सुरक्षाविषयक सतर्कता वाढवण्याचा प्रयत्न करणे, तसेच नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमधला समन्वय अधिक दृढ करणे.देशभक्तीची भावना जागृत करणे नागरिकांना स्वातंत्र्य सैनिक, सुरक्षा दलांचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाची जाणीव करून देणे.भारताच्या सागरी परंपरांचा सन्मान करणे नागरिकांना आपल्या किनारपट्टी प्रदेशातील समृद्ध परंपरा, इतिहास आणि भौगोलिक विविधतेची ओळख करून देणे तसेच या भागाच्या राष्ट्रीय विकासातील योगदान अधोरेखित करणे.असे या मोहिमेचे व सायकल रॅलीचे उद्दिष्ट आहे...

      २१ मार्च रोजी सकाळी ही सायकल रॅली कोकणातील लोणेरे येथे दाखल होणार असून येथील महाविद्यालयात कुलगुरूंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच शाहिद जवानांना अभिवादन व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार आहे.त्यानंतर ही रॅली दापोली,दाभोळ मार्गे रत्नागिरीसाठी प्रस्थान करणार आहे.२२ मार्च रोजी सायकल रॅलीचे रत्नागिरीमध्ये आगमन होणार असून पुढे कन्याकुमारी करिता रॅलीचे प्रस्थान होणार आहे.कोकणात प्रथमच अशी सायकल रॅली येत असल्याने जागोजागी रॅलीचे स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे.तसेच नागरिकांनीही या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे श्री.राम मोहन कमाण्डेन्ट JNPA सेवा यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post