जंगलातील वणव्यात आंबा, मोहगणी हजारहून अधिक झाडे जळून खाक
नुकसानभरपाईच्या मागणीसाठी प्रशासनाकडे धाव
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील मौजा बोरडा येथे लागलेल्या भीषण आगीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता जंगलामध्ये अचानक आग भडकली आणि काही वेळातच शेतामध्ये पसरली. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक आणि झाडे जळून खाक झाली.
बोरडा (सराखा) परिसरात मुझफ्फर हुसैन यांची सर्व्हे नंबर १९१ मध्ये ६.२१ हेक्टर शेती आहे. अचानक जंगल परिसरातून लागलेल्या आगीत या शेतातील १००० आंब्याची झाडे, ५००० मोहगणी झाडे, ५०० निंबूची झाडे आणि ५००० बांबूची झाडे होती, जी पूर्णतः जळून खाक झाली आहेत. याशिवाय, शेतीभोवतीचे तार कंपाऊंड आणि ठिबक सिंचनासाठी वापरलेली पाइपलाइनही आगीत जळून गेली आहे, त्यामुळे संपूर्ण शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीत शेतीचे दिवाणजी बिपीनभाई नन्नुभाई सावलीया आणि सुमारे २० मजूर काम करत होते. आग लागताच त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने झपाट्याने संपूर्ण शेत व्यापले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी ५.१५ वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले, पण तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते. या आगीमागे नेमके कोण जबाबदार आहे? ही आग नैसर्गिकरीत्या लागली की कोणीतरी मुद्दाम पेटवली? यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी या आगीमागील सत्य समोर यावे, दोषींवर कारवाई व्हावी आणि सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. सैय्यद नाझर हुसेन, सैय्यद मुझप्फर हुसेन (माजी आमदार) आणि नुरजहा बेगम सैय्यद नाझर हुसेन यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वनविभाग, पोलिस विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. नुकसानाचे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी.! शेतकऱ्यांना भविष्यात अशा आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.! या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तपास सुरू केला असून पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्याचा आंदोलनाचा इशारा
घटनास्थळी पोलीस कर्मचारी व तलाठी पोहचले असून त्यांनी पंचनामा तयार केला असून, अद्याप कोणतीही नुकसानभरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने त्यांना तातडीने मदत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रशासन या प्रकरणात किती तत्परतेने मदत करणार आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
