पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र बोंद्री परिसरात आग
अंदाचे तीन- चार लाख रुपयांचे नुकसान
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- तालुक्यातील बोंद्री येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्राला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर, पुणे अंतर्गत चालवला जातो. या प्रक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मेंढ्या व शेळ्यांचे संगोपन केले जाते, त्यामुळे येथे चारा व खाद्यसाठा मोठ्या प्रमाणात ठेवलेला असतो. दि. 27 मार्च रोजी दुपारी अचानक 1 वाजताच्या सुमारास विद्युत तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून आगीने रौद्र रूप धारण केले. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात चारा, खाद्यसाठा तसेच शेळी व मेंढ्यांसाठी साठवलेले खत जळून खाक झाले आहे. आगीचा धूर मोठ्या प्रमाणात दिसताच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन केंद्र रामटेक यांना घटनेची माहिती दिली. रामटेक नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे तीन -चार लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. चारा व खाद्यसाठा जळून गेल्याने शेळ्या आणि मेंढ्यांसाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अन्न व पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने प्रकल्पात संगोपनाखाली असलेल्या मेंढ्या व शेळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेची माहिती देताना कनिष्ठ लिपिक, शेळी व मेंढी पालन प्रकल्प बोंद्री यांनी सांगितले की, "या आगीत संपूर्ण चारा व बहुवार्षिक खाद्यसाठा नष्ट झाला आहे... शासनाने तात्काळ मदत दिली नाही तर शेळ्या व मेंढ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते." या आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे... नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे... या आगीत मोठ्या प्रमाणात चारा आणि खाद्यसाठा जळून गेल्यामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे... स्थानिक शेतकरी व मेंढीपालक सरकारकडे तातडीने मदतीची मागणी करत आहेत. जर वेळेत मदत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात मेंढी आणि शेळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते...
