अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी होणार ?
बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते संतोष काटे यांची मागणी
सिडको प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष
माहिती अधिकारात माहिती मिळत नसल्याने व विविध समस्या संदर्भात याचिका दाखल करणार
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )एकीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामावर मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे... तसेच बेकायदेशीर रित्या अतिक्रमण केलेले गाळे, दुकाने, अधिकचे बांधकाम यावरही कारवाई केली जात आहे... मात्र दुसरीकडे पनवेल तालुक्यातील उलवे परिसरात शहरीकरण झपाट्याने होत असून अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत... त्यातही अनेक विकासकांनी (बिल्डरांनी)शासनाची फसवणूक करून उलवे शहरात मोठया प्रमाणात बांधकामे केली आहेत...असे अनेक प्रकार उलवेमध्ये समोर येत आहेत...
उलवे सेक्टर २६ भूखंड क्रमांक ८, सेक्टर १९ भूखंड क्रमांक ४६ B, सेक्टर १७ भूखंड क्रमांक २६ येथे प्राधिकरणाचे, शासनाने दिलेल्या बांधकाम नियमांचे पालन न करता नियम बाह्य पद्धतीने इमारती मोठया प्रमाणात उभे राहत आहेत. अनेक ठिकाणी बिल्डरांनी अतिक्रमणे केली आहेत... अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे बिल्डरांनी बांधली असून उद्या नागरिकांनी हिच अनधिकृत बेकायदेशीर घरे अधिकृत समजून विकत घेतली तर त्यांची मोठया प्रमाणात फसवणूक होणार आहे... तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम व अनधिकृत बांधकाम भविष्यात ढासळल्यास किंवा अपघात झाल्यास त्यात जर जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे... सिडको प्रशासन अशा बिल्डरांकडे, अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे... या सर्व पार्श्वभूमीवर उलवे मधील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट )उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून उलवे शहरातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत इमारती वर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रव्यवहाराद्वारे केली आहे... संतोष काटे यांच्या मागणी नंतर सिडको प्रशासन, पनवेल महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल...माहिती अधिकारात माहिती दिली जात नाही तसेच विविध समस्या संदर्भात संतोष काटे हे हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत...
कोट (चौकट ):-
बांधकाम परवानगी विभाग यांच्या संगमताने, स्क्वेअर फूटला पैसे घेवून भ्रष्टाचार करून परवानग्या दिल्या जातात, प्राधिकरणाचे नियम पाळले जात नाहीत, बांधकाम परवानगी विभाग मधील अधिकारी हे मेरिट वर न बसवता सेटिंग करून बसलेले आहेत...आतापर्यंत बांधकाम परवानगी विभागाने ज्या बांधकाम व्यावसायिकांवर दंड आकारला आहे त्याची यादी जाहीर केलेली नाही, भोगवटा प्रमाण पत्र नसलेल्या इमारतीची माहिती दिलेली नाही... माहिती आधिकरा खाली माहिती मागवली असता दिली जात नाही... नवीमुंबई विमानतळ एनओसीमध्ये टेरेस अमेनिटीसला परवानगी नाही, तरी देखील बांधकाम व्यावसायिक टेरेस अमेनीटीस दाखवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत, सिडकोकडे लेखी तक्रारी देवून निदर्शनास आणून देवून देखील काहीच करवाई करत नाहीत... बनावट पार्किंग दाखवून ग्राहकांची फसवणूक होत आहे... - संतोष काटे, सामाजिक कार्यकर्ते, उलवे
