अंगणवाडीच्या कामाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध !
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती रामटेक अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत बोरडा सराखा येथे अंगणवाडीच्या बांधकामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ग्रामसभेत ठरवलेल्या जागेऐवजी चुकीच्या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी हे काम त्वरित थांबवले आहे. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी एकजुटीने विरोध करत ग्रामसभेच्या ठरावाचा सन्मान करावा आणि अंगणवाडीचे बांधकाम ठरलेल्या ठिकाणीच करण्यात यावे, अशी ठाम भूमिका घेतली आहे...
बोरडा सराखा ग्रामपंचायतीअंतर्गत अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळाली होती. या बांधकामासाठी योग्य ठिकाण ठरवण्यासाठी दि.६ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली. या ग्रामसभेत संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत देवळी येथे अंगणवाडीचे बांधकाम करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, ग्रामसभेच्या या निर्णयाकडे सरपंचांनी दुर्लक्ष करत बांधकाम बोरडा येथे सुरू करण्याचे आदेश दिले. बोरडा येथे होणारे अंगणवाडीचे बांधकाम सर्वार्थाने चुकीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या मते, जि.प. शाळेच्या बाजूला असलेल्या सांडपाण्याच्या नालीवरच हे काम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव राहणार असून, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
याशिवाय, बायपास रस्त्यावर हे बांधकाम होत असल्याने मोठ्या वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल आणि वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास बाधित होण्याची शक्यता आहे. शिवाय, पाठीमागे सत्रापूर उपसा सिंचन प्रकल्प असल्यामुळे मुलांच्या जीवाला धोका आहे. या सर्व परिस्थिती लक्षात घेता, ग्रामस्थांनी या जागेवरील काम त्वरित थांबवून ग्रामसभेच्या ठरावानुसार देवळी येथेच अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावे, अशी ठाम मागणी केली आहे. विशेष म्हणजे, एका ग्रामपंचायत सदस्यांनी देवळी येथील लोकांची दिशाभूल करत ‘त्यांना अंगणवाडी नको आहे’ असे दाखवणाऱ्या अर्जावर सह्या गोळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माजी उपसरपंच ईश्वर नाहले यांनी हा धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, त्यांना विश्वासात घेऊन या अर्जावर सह्या घेतल्या गेल्या. मात्र, हा प्रकार उघड झाल्यानंतर ईश्वर नाहले यांनी चुकीची कबुली देत गावकऱ्यांची माफी मागितली.
या संपूर्ण प्रकारानंतर गावकऱ्यांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी जि. प. सदस्य संजय झाडे, तहसीलदार आणि पंचायत समिती रामटेक यांच्याकडे निवेदन दिले आहे... त्यांनी त्वरित कारवाई करून ग्रामसभेच्या ठरावानुसारच अंगणवाडीचे बांधकाम करावे आणि चुकीच्या ठिकाणी सुरू असलेले बांधकाम थांबवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे...
गावकरी करतील मोठे आंदोलन
हा संपूर्ण विषय आता प्रशासनाकडे पोहोचला असून, ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल का, की स्थानिक सत्ता स्वतःच्या मनमानीने निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे... गावकऱ्यांचा निर्धार ठाम असून, ग्रामसभेचा निर्णय योग्य असून तोच अमलात आणला जावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे... प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर गावकरी मोठे आंदोलन उभे करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे...
