महाराष्ट्र वेदभुमी

न भूतो न भविष्याती वर्धापनदिन सोहळा रोहा -सिटी ऑफ फ्लॉवर्सच्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद,


रोहा (प्रतिनिधी) 

खालू बाजा, लेझीम पथकावर सारेजण थिरकले, निसर्ग फुलविण्याचा संकल्प 

निसर्ग विठ्ठल चराचरी, आम्ही कळसगिरीचे वारकरी असा अनोखा संदेश देत रोटरी क्लब ऑफ रोहा सहयोगी सिटी ऑफ फ्लॉवर्सच्या रविवारी आयोजित वर्धापनदिनी वृक्षदिंडीला रोहा शहर, ग्रामीणवासीय निसर्ग प्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कला क्षेत्रातील शालेय विद्यार्थी, महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मारुती चौक ते नगरपरिषद मार्गे मारुती चौकात आलेल्या वृक्षदिंडीचे व्यापारी बंधू, नागरीक यांनी जोरदार स्वागत केले. झाडांच्या विविधतेप्रमाणे अक्षरशः रंगीबेरंगी वेशभूषा करत निसर्ग फुलवण्याचा संकल्प केलेल्या कळसगिरीच्या वारकऱ्यांनी अवघा रोहा निसर्गमय केला. खालू बाजा, लेझीम पथकावर महिला, पुरुषांनी ठेका धरत चांगलेच थिरकल्याचे दृश्य पाहायला मिळाले. एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळी चैत्र पालवीत शहरातून काढलेली वृक्षदिंडी सोहळा न भूतो न भविष्याती अशीच नोंद झाली आहे. दरम्यान, रोटरी क्लब ऑफ रोहा सहयोगी सिटी ऑफ फ्लॉवर्स, गडकिल्ले, निसर्ग, साहित्य, शिक्षण, कला संस्थांचा वृक्षदिंडी कार्यक्रमातील सहभाग लक्षवेधी ठरल्याची भावना व्यक्त झाली. रंगीत फुलांचे शहर म्हणून हाती घेतलेला कळसगिरी जंगल पर्यटन, ऑक्सिजन ठिकाण बनवण्याचा संकल्प दिंडीतील सहभागी कळसगिरीच्या वारकऱ्यांनी यावेळी केला आहे...


रोहा शहराचे नैसर्गिक वैभव असलेला कळसगिरी जंगल फुलवण्याचा निर्धार रंगीत फुलांचे शहर ग्रुपने केला. वर्षभरात कळसगिरीच्या कुशीत अनेक रंगीत फुलांची झाडे लावण्यात आली. दर रविवारी सबंध रोहेकरांच्या श्रमदानातून झाडांना पाणी देणे, स्वच्छता, व्यायाम आदी उपक्रम राबवले जाते. पाण्यासाठी प्राचीन ढाचा असलेला तलाव मोकळा करण्यात आला. तलावाची नव्याने पूर्णबांधणी सुरू आहे. कळसगिरी जंगल फुलफळांनी पुन्हा बहरावा, पशू प्राण्यांना हक्काचे घर, खाद्य मिळावे, रोहा शहराला अधिक गतवैभव मिळावे असा वसा घेतलेल्या सिटी ऑफ फ्लावर्सच्या कार्याला १ वर्ष पूर्ण झाले. याचे औचित्य साधून सायंकाळी रोहा शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख, स्पंदनच्या अध्यक्षा स्नेहा अंबरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय नारकर रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, जेष्ठ नागरिक अध्यक्ष रावसाहेब सरफळे, प्राचार्य अतुल साळुंखे, गजानन मळेकर, प्रकल्प प्रमुख सुरेंद्र निंबाळकर, मार्गदर्शक उदय ओक, बापू जोशी, हेमंत ओक, राजू जैन, राजेंद्र पोकळे, डॉ. विरेंद्र, अरुंधती पेंडसे यांसह व्यापारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पंदनच्या रंगीबेरंगी वेषभूषातील विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रोहा कोलाड ज्वेलर्स यांसह उदय ओक, किरण बेंडखळे यांनी निसर्ग वारकऱ्यांच्या अल्पोहराची उत्तम व्यवस्था केली.


वृक्षदिंडी पालखीत तुळशीचे रोपटे ठेवण्यात आले. पालखीचे अनेकांनी दर्शन घेत झाडे झुडपे निसर्ग आपले सोबती आहे. त्याचे जतन, संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी सर्वच उपस्थितांनी केला. झाडे पाणी राखू जंगलात, कशाला प्राणी येतील शहरात, आओ मिलकर वृक्ष लगाये, सब मिलकर धरती बचाये असा अनमोल संदेश घोषणातून देण्यात आला. विद्यार्थी, मान्यवरांच्या हातातील संदेश फलकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतली. शहरातील सर्वच व्यापारी बांधवांना यावेळी तुळशीचे रोपटे भेट देण्यात आले. नगरपरिषद चौकात भजन सम्राट हेमंत ओक, उदय ओक यांनी भारत का बच्चा बच्चा.. गाणे गाऊन वृक्षदिंडीत कमालीची जान आणली. वृक्षदिंडी समारोप कार्यक्रमात आपण सर्वांनी जंगल, झाडांचे रक्षण करून रोहा हिरवेगार करू या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा आशावाद स्पंदनच्या स्नेहा अंबरे यांनी व्यक्त केला. प्राचार्य अतुल साळुंखे यांनी कळसगिरी प्रकल्पाची माहिती देत निसर्ग जतन एक चळवळ बनवू या असे आवाहन केले. प्रकल्प प्रमुख सुरेंद्र निंबाळकर यांनी कळसगिरीच्या कुशीत दर रविवारी सर्वांनी या, निसर्गाशी एकरूप व्हा, प्रकल्प समजून घेत आपण सर्व मिळून एक पर्यटन ठिकाण बनवू, तुमचा सहभाग गरजेचा आहे असे निंबाळकर यांनी सांगितले. वृक्षदिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रकल्प प्रमुख सुरेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शक उदय बापू जोशी, हेमंत ओक, विज्ञान खवरे, राजेंद्र जाधव किरण बेंडखळे, दळवी बंधू, स्वप्निल परांजपे, स्वप्नाली निंबाळकर, समिधा अष्टिवकर, विदुला परांजपे, हेमंत मोहिते, सिद्धी बोथरे, दीपा चव्हाण, विद्या नुल्ला, अरुंधती पेंडसे, अविनाश निंबाळकर, दीप्रेश सावंत, नितीन सोळंकी, रूपेश साळवी व निसर्ग प्रेमी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालक राजेंद्र जाधव, आभार दर्शन विज्ञान खवरे यांनी केले. दरम्यान, सिटी ऑफ फ्लॉवर्सचा वृक्षदिंडी सोहळा न भूतो न भविष्याती असाच झाला. उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Post a Comment

Previous Post Next Post