*सण पाडव्याचा*
अभंग
सण पाडव्याचा| गुढी मांगल्याची||
करु चांगल्याची|सुरूवात||१||
पिवळी केशरी|माळ सुंदरशी||
शोभिवंत तशी|झेंडू फुले||२||
गुढी पाडव्याच्या|शुभ मुहूर्ताने||
गृहप्रवेशाने| सुख येई||३||
साडे तीन शुभ| मुहूर्त मानावे||
प्रत्येकाचे व्हावें|सारे भले||४||
रेशमी कापड| काठीला बांधून||
तांब्याला सांधून| सौख्य यावे||५||
साऱ्यांना शुभेच्छा| देत मनोमन||
प्रेमळ जीवन| जगू चला||६||
सचिन म्हणतो | आनंदाचा क्षण||
पाडव्याचा सण| आला आज||७||
*सचिन पाटील*
*(अलिबाग)*
_________________________
*गुढीपाडवा*
दशरथ पुत्र रामचंद्रांनी
लंकेवर विजय मिळवला
त्यांच्याचस्वागतासाठीसर्वानी
प्रत्येकघरी गुढ्या उभारल्या
अयोध्या नगरीला हर्ष झाला
दुष्टांवर सुष्टां जय मिळाला
सत्य युगातील हा महोत्सव
कलीयुगातही चालू राहीला
श्रीरामांचे सद्गुण घेऊनी
सत्ययुगाचा संकल्प करुया.
गुढीपाडव्याच्या सर्वांना
मनापासून शुभेच्छा देवुया
कावियित्री
सौ. शर्मिला जोशी
. श्रीवर्धन रायगड
_________________________
*गुढी उभारू पर्यावरणाची* !!
सरली सुरेख थंडी...
फोफावला उन्हाळा....
संतप्त सूर्य आला...
ओकेल तप्त ज्वाळा....
पक्षी दिशा दिशांना...
फिरतील ते थव्यांनी....
सुकतील कंठ त्यांचे...
मग ..शोधतील पाणी...
सुकली तळी जलाची...
पाणी पिण्यास नाही....
त्या सानुल्या जीवांची...
होईल लाही - लाही...
त्यांच्या जीवाकरिता...
इतकीच करा सेवा...
वाटीत एवढेसे...
पाणी भरून ठेवा....
*आला गुढीपाडव्याचा सण*
नेसली रेशमी साडी
त्यावर भरजरीचा खण
मांगल्य आणि समृद्धीचा
आला गुढीपाडव्याचा सण
सोनेरी पहाट वसंताची
अंगी सुगंधी चंदन
नवा आरंभ नवा विश्वास
आला गुढीपाडव्याचा सण
चंदनाचा पाठ सोन्याची काठी
दारी रांगोली नटलं अंगण
चैतन्याने कडुलिंब लागे गोड
आला गुढीपाडव्याचा सण
संस्कार परंपरेची रुढी
आशेची पालवी सुखाची जाण
नव वर्ष करू साजरे
आला गुढीपाडव्याचा सण
कवी
अजय शिवकर
_________________________
*सण पहिला गुढीपाडवा*
तप्त झळांच्या उन्हात
वसंत ऋतू बहरतो
तहानल्या सृष्टीत जणू
नवचैतन्य फुलवतो
मराठी सनाची सुरूवात
गुढीपाडवा सणाने होते
मनी प्रत्येकाच्या उल्हास
दारी झेंडू तोरण शोभते
रात सरता अमावस्येची
चैत्र प्रतिपदा उगवली
रामप्रहरी सडारांगोळी
गुढी आनंदाने उभारली
साडेतीन मुहूर्ताचा दिवस
शुभारंभ चांगल्या गोष्टींचा
सारे चाखू गुळ कडूनिंब
होई लाभ आरोग्य संपदेचा
कवियित्री
अनिता कांबळे
रायगड
_________________________
*स्वागत मराठी नववर्षाचे*
*गुढी पाडवा*
*
मराठी नववर्ष साजरे
करिती चैत्र शुध्द प्रतिपदेस
या शुभदिनी होई
विश्वनिर्मिती ब्रम्हदेवाकरवी
सत्ययुगाचा प्रारंभ असे......
मराठी मासात प्रथम मास
असे हा चैत्र मास
शालीवाहन संवत्सराचा
पहिला दिवस असे हा
जनमानसात घरोघरी
गुढी तोरणे उभारती
विजयाचे अन समृध्दीचे
प्रतिक असे हे उत्साहाचे.....
भारतीय संस्कृती
असे अनमोल
महापर्व असे
चैत्रशुध्द प्रतिपदेस
नवसंकल्प, नवी योजना,
नववस्तू खरेदी,
सुवर्ण खरेदी,
करुनी होई
प्रगतीची वाटचाल,
स्वागत होई आनंदाने.....
या काळी असे
तप्त उन्हे धरणीवरती
म्हणूनी प्रात:काळी गृहिणी
आरोग्याचे रक्षण करण्या
देती सकला
ओवा, मीठ, हिंग,
मिरी, साखर
कडीनिंबासंगे
सेवन करावया
चैत्र शुध्द प्रतिपदेच्या
मुहूर्तावरती.....
रावणावरी विजय
मिळवूनी अन चौदा वर्षे
वनवास संपवूनी
चैत्र शुध्द प्रतिपदेस
श्रीरामचंद्र येती
अयोध्देशी परतूनी
प्रजा आनंदाने गुढया तोरणे
उभारुनी स्वागत करती
अन मराठी नववर्षाच्या
शुभेच्छा देती एकमेंका
गळाभेटी घेवून…. ...
*कवयित्री*
सौ. दिपाली प्रविण कांदळगांवकर,
ठाणे,
_________________________
गुढीपाडवा
चला अंगणी गुढी उभारून
स्वागत करुया नववर्षाचे
सडा सारवण काढुन रांगोळी
स्मरण करू पूजनीय श्रीरामाचे
चौदा वर्षाचा वनवास भोगूनी
दुष्ट रावणावरी विजय मिळविला
अयोध्या नगरी स्वागता उभी
उधाण आले जणू आनंदाला
जिकडेतिकडे सडे फुलांचे
बहर आला वृक्षवल्लरिना
दिवस परतले सुख समृद्धिचे
आनंद झाला या त्रिभुवना
कवियेत्री
सौ .सीमा रिसबूड
श्रीवर्धन
_________________________
*गुढीपाडवा*
अनेक रहस्यांनी भरलेले श्रीरामांचे जीवन
त्या रहस्यमय कथेलाच म्हणती रामायण
याच रामायणाच्या अंताला
रावणवध वर्णिला
मिळवून विजय श्रीरामांनी
पराक्रम गाजविला
महाबलाढ्य, महापराक्रमी
ब्राह्मण दशग्रंथी असे असुनही
रावणाची का झाली ही स्थिती
अहंकारावर करूनिया मात
नम्रता विजयी झाली
तमोगुणावरती सत्वगुणाने
पहा बाजी मारली
असुरी शक्तींवर दैवी शक्तींनी
विजयश्री मिळविली
प्रतीक विजयाचे म्हणुनी
गुढी घरोघरी उभारिली
गुढ उकलले जेव्हा
श्रीराम परतले आयोध्येस
उभारिल्या गुढ्या घरोघरी
तो असे पाडव्याचा दिवस
हिंदू नववर्षाचा प्रथम दिन
हा चैत्र शुक्ल प्रतिपदेचा
नवचैतन्य स्फूर्ती घेऊनी येतो
सण गुढीपाडव्याचा
कवी
दिलीप रामदास मोकल
अलिबाग
_________________________
गुढीपाडवा !
शालिवाहन शकारंभ म्हणजे पाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी असे पाडवा
चैत्र नवरात्राची सुरुवात असे पाडवा
सुमंगलाचा संकेत म्हणजे गुढीपाडवा !
सृष्टी निर्माणाचा दिन म्हणजे पाडवा
ब्रह्मध्वज उभारण्याचा दिवस पाडवा
राम राज्यात परतण्याचा दिन पाडवा
सुमंगलाचा संकेत म्हणजे गुढीपाडवा !
ऋतुराजाच्या सोबतीने येतो पाडवा
वसंताची चैत्रपालवी म्हणजे पाडवा
चैतन्यमयी वातावरण म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत म्हणजे गुढीपाडवा !
घरापुढे उभारलेलीगुढी म्हणजेपाडवा
दारास बांधलेले तोरण म्हणजे पाडवा
दारापुढील रांगोळी म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत म्हणजे गुढीपाडवा !
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असे पाडवा
शुभकार्याचाश्रीगणेशा म्हणजे पाडवा
विजयाची मुहूर्तमेढ म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत म्हणजे गुढीपाडवा !
सुख समृद्धीचे प्रतिक म्हणजे पाडवा
मनोमिलनाचा उत्सव म्हणजे पाडवा
सुखानंदाची पखरण म्हणजे पाडवा
सुमंगलाचा संकेत म्हणजे गुढीपाडवा !
गोडधोडाचा मराठमोळा सण पाडवा
चित्त प्रफुल्लित करणारा सण पाडवा
मराठी वर्षाची सुरुवात करतो पाडवा
सुमंगलाचा संकेत म्हणजे गुढीपाडवा !
कवी
प्रविण शांताराम म्हात्रे
पनवेल
_________________________
*नव्या वर्षाची सुरवात…*
*मंद वारा वसंताची*
*चाहूल घेऊन आला..*
*पालवी मधल्या प्रत्येक*
*पानात नवंपण देऊन गेला..*
*त्याने नवीन वर्षाची*
*सुरुवात ही अशीच केली..*
*नाविन्याच्या आनंदासाठी*
*तो मंगल गुढी घेऊन आला..*
*अशा या आनंदमयी*
*चित्राची सोनेरी पहाट*,
*नव्या स्वप्नांची नवी लाट,*
*नवा आरंभ, नवा विश्वास,*
*नव्या वर्षाची हीच तर*
*खरी सुरवात…*
पुरूषोत्तम गं निकते
______________________
*हिंदूंचे नववर्ष गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा*
