महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यात डोंगरांना वनवे लावण्याच्या प्रमाणात वाढ, डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी, वनसंपदेसह जैव विविधता धोक्यात,


कोलाड (श्याम लोखंडे ) 

रोहा तालुक्यात डोंगरांना वणवे लावण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून प्रंचड लागत असलेल्या वणव्यामुळे दिवसेंदिवस वनसंपदा आणि जैव विविधता धोक्यात आली आहे.दरम्यान खांब येथील तसेच वैजेनाथ माथ्यावरील डोंगराला रविवारी रात्री भयानक लागलेला वणव्यात सारे डोंगर तसेच वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.दरवर्षी तालुक्यातील अनेक जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणात अजिबात घट नाही. जानेवारीपासूनच जंगलांना वणवे लागण्याचा घटनाक्रम एका पाठोपाठ एक डोंगर भागात सुरू झाला. याच वणव्याची मालिका सुरू झाली मात्र वनखाते विभागाकडून यावर उपाय योजना आखली जात नाही... 


अनेक जंगल वणव्याला बळी पडत असताना दिसत असुन याबाबत पर्यावरप्रेमींचा जीव तुटत आहे.रविवारी सायंकाळी खांब, आंबेवाडी, किल्ला, धाटाव,वाशी, लांढर,संभे,सुकेळी, धानकान्हे, परिसर जंगलाला भीषण वणवा लागल्याचे भयान दृश्य पाहायला मिळाले. वैजेनाथ माथ्यावरील जंगलाला तसेच सुरगडाच्या पायथ्याशी लागलेल्या वणव्याची तिव्रता भयानक होती. अख्खा जंगल जळून खाक झाले की काय ? असेच अनेक ठिकाणाहून हे जाणवत होते. जंगलातील वनसंपदा वर्षानुवर्षे होरपळत आहे. आतापर्यंत जिल्हा, तालुक्यातील अनेक जंगल वणव्याच्या भक्षस्थानी पडले. जंगलातील भलीमोठी झाडे, पशु, पक्षी नष्ट झालीत. जंगलच संपत आल्याने अनेक परिसरात वाळवंट जाणवत आहे, 


उष्णतेच्या प्रमाणात भयानक वाढ झाली आहे माणसाच्या जीवाची लाही लाही होत आहे,पाण्याची पातळी नाहीसी होत आहे, विहिरी, बोअरवेल सुकाड पडल्या, हाच धोका विचारात घेता वणव्यावर ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या पाहिजेत. मात्र ठोस उपायांकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने रोजच्या वणव्याने उर्वरीत जंगल सुरक्षीत राहतील का ? अशी भीती आता पर्यावरप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे...

तर वाढत्या वणव्या समस्येवर प्रशासन अधिक व्यापक काम अथवा उपाय योजना आमलात येईल का ? तशी विभागावर टीम सज्ज आहे का , यावर पर्यावरप्रेमींकडून प्रश्न निर्माण झाला आहे तर जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत, वणवे लागूच नयेत, लगेच विझवण्यासाठी व्यापक सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरजही यातून या प्रेमिंकडून व्यक्त झाली आहे.तालुक्यातील जंगलांना दरवर्षी वणवा लागत असल्याने वनसंपदा पूर्णत: धोक्यात आली. शहर आजूबाजूच्या जंगलांतील अनेक दुर्मिळ झाडे, पक्षी संकटात आले. डोंगरांना अक्षरशः टक्कल पडले. दुसरीकडे दगड, माती खाणीच्या हव्यासाने जंगल संपत आले. याकडे वनविभागाला लक्ष द्यायला वेळ नाही. झाडे तोडली जात आहेत, पण काही वनाधिकाऱ्यांची व्यवहार्य बाब जंगलांसाठी अधिकच भयानक ठरत आहे, हे वास्तव असताना दररोज तालुक्यात अनेक जंगलांना वणवे लागल्याच्या घटना सुरूच आहेत. त्यात काही शेतकऱ्यांची शेत जमीनच डोंगर पायथ्याशी असल्याने त्यांनी राखून ठेवलेले गवत आणि भाताचे पेंढे त्याच बरोबर लागवड केलेली झाडे फलबाग हे देखिल काही ठिकाणी या वणव्यात नष्ट होत असताना दिसत आहेत...

प्रतिक्रिया..

डोंगर भाग जंगलांना वणवे लागण्याच्या घटनेने पर्यावरनप्रेमीं सह साऱ्यांनाच चटका लावून जात आहे .त्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त झाली. दरम्यान, दररोजच्या वाढत्या वणव्यावर वनविभाग आतातरी नेमका काय उपाययोजना करतो ? हे समोर येणार आहे तर वणवा समस्येवर अधिक प्रभावी लोक चळवळ उभी करावी लागेल असाच हा प्रकार आहे, हे ठळकपणे नमूद झाले असल्याची प्रतिक्रिया स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेने अध्यक्ष तसेच पर्यावरण प्रेमी अजय भोसले यांनी दिली..

Post a Comment

Previous Post Next Post