रोहा : विशेष प्रतिनिधी
रखरखत्या उन्हात परीक्षेला जाताना विद्यार्थी आजारी पडतील, पेपर लिहिताना घामाघूम होतील ;
रोहा,दि.२३ मार्च, :-सध्या सर्वत्र परीक्षांचा हंगाम सुरू असून बारावीची परीक्षा संपली असून दहावीचीही परीक्षा अंतिम टप्प्यावर आली आहे. तर होळी सणानंतर लगेचच सर्वत्र वार्षिक सत्र परीक्षा सुरू होणार असून या परीक्षांच्या वेळा दुपारी असल्याने रखरखत्या उन्हात परीक्षेला जाताना आणि परीक्षेचा पेपर सोडवताना विद्यार्थ्यांचा अक्षरक्ष: घाम निघणार आहे. पालकांनी या बदललेल्या वेळेबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली असूनया परीक्षा वेळापत्रकात बदल करावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे...
दरवर्षीच्या परीक्षा हंगामाचा विचार करता माध्यमिक शाळांच्या इतिहास पाहिले तर उन्हापासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी लहान मुलांची परीक्षा या सकाळ सत्रात घेतल्या गेल्या आहेत.परंतू या वर्षी मात्र शासनाने कसलाही विचार न करता सरसकट स.११ ते दु.१ व दु.२ ते ५ या वेळेत पेपर लिहिण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. दरवर्षी वार्षिक परीक्षा या सकाळ सत्रात घेतल्या जातात. परंतू या वर्षी मात्र शासनाने लहान मुलांच्या कोवळ्या वयाचा विचार न करता स. ११ ते दु.१ या वेळेत परीक्षेचा घाट घातला आहे. सध्या वातावरणातील उष्म्याचे प्रमाण दिवसागणिक कमालीचे वाढत चालले आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील वातावरणा सारखी परिस्थिती आताच जाणवू लागली आहे. तापमान कमालीचे वाढले आहे, वाढत्या उष्णतेमुळे विविध प्रकारच्या शारीरिक व्याधींसह शरीराला चांगलाच थकवा जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या कोवळ्या वयाचा व शरीर प्रकृतीचा विचार न करता आरोग्याशी खेळणाऱ्या शासनाला यामधून नक्की काय साध्य करायचे आहे ? असा संतप्त सवाल पालकवर्गाने उपस्थित केला आहे. परिणामी शिक्षण विभागाने या परीक्षा वेळापत्रकात तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी संतप्त पालक वर्गातून होत आहे...
प्रतिक्रिया :-
रायगड जिल्ह्यात मार्च अखेरिस वातावरण कसे असते हे काय शिक्षण विभागाला माहिती नाही का ? प्रचंड उष्म्यात घराबाहेर पडणे मोठ्यांना नकोसे वाटत असते, अशा गरम वातावरणात लहान मुलांच्या परीक्षा सकाळ ऐवजी दुपारी घेण्याचे शिक्षण विभागातिल अधिकाऱ्यांना सुचते तरी कसे, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का. ? रखरखत्या उन्हात परीक्षेला जाताना विद्यार्थी आजारी पडले तर त्याची जबाबदारी हे बिनडोक अधिकारी घेणार का ?
- नितिन परब, अध्यक्ष, रोहा सिटीझन फोरम तथा सामाजिक कार्यकर्ते, रोहा
