पेण,(विशेष प्रतिनिधी)
आगरी समाजावर शासनकर्त्यांकडून सातत्याने अनन्य अत्याचार सुरु आहेत... लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे तर शासनकर्ते बेलगाम वागू लागले आहेत. त्यांनी आगरी माणसाला अंधारात ठेवून देशोधडीला लावण्याचे षडयंत्र रचले आहे. आगरी माणसाचे जगण्याचे पारंपरिक साधन असलेल्या शेतजमिनींचे मन मानेल तसे लचके तोडून त्याला भिकेला लावण्याचे घोर पाप केले आहे. इतरांना पायघड्या घालतांना आगरी माणसाला पर्यायी साधन देण्याचे दायित्वही ते विसरले आहेत. जमिनी घेताना विकासाचा बागुळबुवा आणि नोकऱ्यांचे अमिष दाखवले जातेय. मात्र प्रत्यक्षात स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य देण्याच्या शासन धोरणाचा फज्जा उडविला जात आहे. या आणि अशा विविध अन्यायाविरुद्ध आगरी ज्ञातीच्या लोकांनी पेटून उठले पाहिजे. असे कळकळीचे आवाहन आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी वढाव ( ता. पेण) येथे आयोजित जनसंवाद सभेत बोलताना केले.
आगरी समाज बांधवांमध्ये व्यापाक जनजागृतीच्या माध्यमातून समाजावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करुन देण्यासाठी आणि अधोगतीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आगरी माणसाला वाचवण्यासाठी अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेतर्फे राज्यभरात जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यादृष्टीने जनसंवाद सभांचा सपाटा लावला आहे. घोटी-ईगतपुरी, जोहे येथून या अभियानाला सुरुवात झाली असून वढाव येथे २० तारखेला निवृत्त तहसीलदार सुभाष म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
या सभेत सामाजिक कार्यकर्त्या सौ. नंदा म्हात्रे, माजी पं. स. सदस्य अनंत पाटील, सागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बंड्याशेठ पाटील, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, गोरख पाटील, निवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर सुधाकर पाटील, ज्येष्ठ नेते वसंतशेठ ठाकूर, संस्थेच्या ट्रस्टी सौ. कल्पना टेमकर, सह खजिनदार रवींद्र म्हात्रे, शिवसेना नेते नंदू मोकल, संजय पाटील, आदी मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात समीर म्हात्रे यांनी प्रत्येक गावागावात तरुणांची फळी उभी करण्याचा निर्धार बोलून दाखविला. आणि आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी तरुणाईला हाक दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाष म्हात्रे यांनी या लढाईत सूर्यकांत पाटील यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. तर भूसंपादनासंदर्भात सर्वांना सखोल माहिती मिळावी म्हणून एक भव्य सभेचे आयोजन करण्याची घोषणा केली.
आपल्या घणाघाती भाषणात सूर्यकांत पाटील यांनी पुढे म्हटले की, कुलकायद्याच्या माध्यमातून सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांना जमिनीचे मालक बनविले खरे, परंतु विकासाच्या नावाने त्याच जमिनी पुन्हा काढून घेऊन त्यांना गुलामीकडे ढकळण्याचे कटकारस्थान रचले जात आहे.
दुसरीकडे मॅग्रोजचे भय दाखवून त्यांचा मालकी हक्क संपुष्टात आणला जात आहे. एकीकडे अनधिकृत झोपडपट्टी धारकांना पक्की घरं दिली जाताहेत, तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर हातोडा मारला जात आहे. नोकऱ्या असूनही स्थानिक तरुणांना उपाशी तडफडत ठेवले जात आहे. या अन्यायाविरुद्ध समाजाने संघटित होऊन तीव्र लढा द्यावा. अन्यथा समाज रसातळाला जाईल. असा इशाराही शेवटी त्यांनी दिला...
