कोलाड (श्याम लोखंडे)
कोलाड ते नागोठणे दरम्यान काम संथ गतीने, नवीन बांधकामाला तडे,महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम बाकी .
देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील सभेत मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील चौपदरी करणाचे काम २०१८ ला पुर्ण होईल असे सांगितले होते.नंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्या गणेश उत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पुर्ण होईल व डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण महामार्गाचे काम पुर्ण होईल असे सांगितले होते. परंतु महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही फक्त तारीख पे तारीख अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे... काही दिवसापूर्वी महामार्गावर जागोजागी लावण्यात आलेल्या फलकावर असे नमूद करण्यात आले कि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ कासू ते इंदापूर दरम्यांतील ४२/००ते ८४/०० कि.मी.या लांबीतील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मे. कल्याण टोळवेज प्रा.लि.या कंपनीला दिलेले असुन हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पुर्ण करण्याचे अपेक्षित होते. तथापी उपरोक्त कंपनीच्या नियोजना अभावी सदरच्या कामाला विलंब होतअसल्याचे दिसून येत आहे तरी हे काम मे २०२४ पर्यंत पुर्ण करण्याचे आश्वाशीत केले आहे. असे शासनाकडून सांगण्यात आले आहे....
परंतु कोलाड ते नागोठणे दरम्यानचे महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असुन या महामार्गांवरील सुकेळी खिंडीतील तयार करण्यात आलेल्या नवीन बांधकामाला पाणी न मारल्यामुळे पंधरा पंधरा मिटरवर या रस्त्याला जागजागी तडे गेले आहेत हे गेलेले तडे हे केमिकल मिश्रित सिमेंटने भरले गेले असुन यामुळे हा रस्ता किती दिवस तग धरू शकेल हे सांगता येत नाही.शिवाय या मार्गांवरील पुई येथील महिसदरा नदी वरील पुलाचे गेली कित्येक वर्ष रखडलेले काम नुकतेच सुरु केले गेले मात्र ते देखील मागील चार दिवस बंद व चार दिवस सुरु राहत असल्याचे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.यामुळे या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी अधिक किती महिने की वर्ष लागतील हे ही सांगता येत नाही...
१५ वर्षांपूर्वी या महामार्गाचे काम सुरु करण्यात आले होते यावेळी चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या व्यावसायिकांच्या दुकानाची जागा उपलब्ध करण्यासाठी दुकानातील माल काढण्यासाठी ही कोणतेही सवड न देता त्यांच्या दुकानावर बुलडोझर फिरवण्यात आला होता.मग अकोला ते अमरावती ७५ किलोमीटरचा रस्ता बनवून जागतिक विक्रम करुन स्वतःची पाठ थोपटवून घेणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तब्बल १५ वर्षे उलटून गेली तरी मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरचा रस्त्याचे काम पुर्ण करणे शक्य झालेला नाही.यामुळे प्रशासनाला या अनोख्या विक्रमाचा एक आगळवेगळा पुरस्कार दिला पाहिजे..
मुंबई-गोवा महामार्गांवरील वाकण ते कोलाड दरम्यान रस्त्याची एवढी भयानक अवस्था आजही पाहवयास मिळत आहे की या मार्गांवरील धुरळा व खड्डे यामुळे भर दिवसा देखील प्रवाशी वर्गाला आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.कारण या मार्गांवरून वाहन चालवतांना प्रवाशी वर्गाची होत असलेली हेळसांड व हाडे ही खिलखिलीत होत आहेत याशिवाय येथील रस्त्याला पडलेल्या धुरळा प्रवाश्यांच्या नाकातोंडांत जाऊन असंख्य प्रवाशी आजारी पडत आहेत.या निष्क्रिय प्रशासन आणि नियोजन शुन्य कारभारामुळे 'मृत्यूचा सापळा महामार्ग, अशी नवीन ओळख या महामार्गाला मिळाली आहे.
या महामार्गाची कामे सुरु असलेल्या ठिकाणी गायब झालेले सर्व्हिस रोड.नियम न पाळताच बनविलेले स्पीड ब्रेकर, रस्त्यासाठी वापरण्यात आलेले निस्कृष्ठ दर्जाचे सामान, ठेकेदारावर प्रशासनाचा नसलेला वचक,अशा नियोजन शुन्यमुळे हा मार्ग रखडला आहे.परंतु याचा परिणाम प्रवाशी वर्गाला भोगावा लागत असुन या महामार्गांवरून प्रवास करणाला प्रवाशी सुखरूप घरी परत जाईल का नाही याची खात्री देता येत नाही.


