रोहा, दि.०१ ऑक्टो. विशेष प्रतिनिधी :
निविदा न काढता मर्जीतील ठेकेदारावर लाखोंची उधळपट्टी
तीन लाखांच्या पुढे काम देताना निविदा काढणे गरजेचे असताना रोहे एमआयडीसीत मर्जीतील ठेकेदाराचे चांगभले करण्यासाठी सध्या लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे...विशेष म्हणजे हे काम करताना ठेकेदाराने थेट रस्त्यांच्या साईडपट्ट्याच गिळंकृत केल्याने वाहतुकीचा जांगडगुत्ता होत आहे... रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या या गलथान कारभाराने तीव्र संताप व्यक्त असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे...
खुलेआम नियम डावलून ठेकेदाराने थेट रस्त्याच्या साईडपट्ट्यांवरच केले अतिक्रमण
रोहा एमआयडीसी अंतर्गत रस्त्याच्या बाजूने सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे...असोसिएशनने एमआयडीसीची परवानगी न घेताच हे काम सुरू केले आहे... आश्चर्य म्हणजे सुशोभीकरण करताना ठेकेदाराने थेट रस्त्याच्या साईडपट्ट्यांवरच अतिक्रमण केले आहे...खुलेआम नियम डावलून हे काम केले जात असून प्रशासन ढिम्म असल्याने याचा वाहतुकीला फटका बसत आहे...विशेष म्हणजे सदर काम टेंडर न काढता मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आले आहे...
प्रतिक्रिया :-
ट्रक टर्मिनस तसेच प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत असताना त्याकडे कानाडोळा करून सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे...मात्र या महत्त्वाच्या प्रश्नाकडे कानाडोळा करून असोसिएशन ही उधळपट्टी नक्की कुणासाठी करत आहे? - आप्पा तथा प्रदीप देशमुख, निमंत्रक, रोहा सिटिझन फोरम
सुशोभीकरणाच्या बांधकामामुळे वहातूकीला अडथळा निर्माण होतो आहे... रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशनला सदर बांधकाम काढून टाका असे सांगितले आहे... -एस. एस. गीते, सहा अभियंता रोहा, एमआयडीसी
एमआईडीसी अंतर्गत रस्त्यांवर स्थानिकांकडून अतिक्रमण वाढत आहे...सदर अतिक्रमण रोखण्यासाठी रस्त्यालगत सुशोभीकरणाचे बांधकाम सुरू केले...मात्र वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्याने आणि स्थानिक रहिवाशांनी एमआयडीसीकडे तक्रार केल्याने सदर सुशोभीकरणाचे काम बंद पडले आहे...या कामाची निविदा प्रक्रिया झालेली नाही...सुशोभीकरणाच्या कामासाठी आतापर्यंत साडेतीन लाख रुपये खर्च झाले आहेत.. -डी. जी. नांदगावकर, कार्यकारी संचालक आर. आय. ए.

