कोलाड ( प्रतिनिधी ) श्याम लोखंडे:
कोलाड नाका येथे आरती जागर आंदोलन..शा. नितीन पवार यांनी लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात घातले झणझणीत अंजन
गणेशोत्सव ८ दिवसावर आला तरीही मुंबई गोवा महामार्गाच्या एका लेनचे काम पुर्ण झाले नसून हे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होणे अशक्य असल्याने हा महामार्ग लवकर पुर्ण होऊन गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड प्रेस क्लबच्यावतीने कोलाड नाका येथे श्री गणपतीची महाआरती करण्यात आली... देवा, आमच्या लोकप्रतिनिधींना सुबुद्धी दे, हायवे प्रशासनाला सुबुद्धी दे आणि हा रस्ता होउदे असे गाऱ्हाणे म्हणत श्री गणरायाला साकडे घालण्यात आले...यावेळी बाल्या नाचाच्या एकेरी बारीतून शाहीर नितीन पवार यांनी लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले...
नवीन टेक्नॉलॉजी बासनात बांधून खड्डेमय रस्त्याच्या ठिकाणी डांबराचे थर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न
गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या एका लेनचे काम पुर्ण होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले होते...मात्र हे काम गणेशोत्सवा पुर्वी पुर्ण होणे अशक्य असल्याने रायगड प्रेस क्लबच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन केले गेले. त्यानंतर ५ वेळा या कामाची पाहणी करून बांधकाम मंत्र्यांनी पुन्हा पुन्हा गणेशोत्सवापूर्वी एक लेन पुर्ण करू असे आश्वासन जनतेला दिले... मात्र हे काम येत्या ८ दिवसात पुर्ण होणार नसल्याने आपली नवीन टेक्नॉलॉजी बासनात बांधून अपुर्ण असलेल्या खड्डेमय रस्त्याच्या ठिकाणी डांबराचे थर टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे...त्यामुळे रायगड प्रेस क्लबच्यावतीने मंगळवारी कोलाड नाका येथे गणरायासमोर महाआरती म्हणून हा महामार्ग लवकर पूर्ण होवो, गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होऊन लोकप्रतिनिधी व शासनकर्त्यांना चांगली बुद्धी देवो असे साकडे घालण्यात आले...
रायगडमधील पत्रकार मोठ्या संख्येने हजर मुंबई गोवा महामार्गाचे काम पुर्ण होत नाही... आंदोलन होत राहतील? दिला इशारा...
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, प्रसिद्धी प्रमुख कमलेश ठाकूर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, उपाध्यक्ष मोहन जाधव, अनिल मोहिते, सचिव अनिल मोरे, संपर्क प्रमुख भारत गोरेगांवकर, परिषद प्रतिनिधी शशिकांत मोरे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांसह रायगडमधील पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी शासनकर्ते व कोकणातील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयते विरोधात चीड व्यक्त करीत जोपर्यत मुंबई गोवा महामार्गाचे काम पुर्ण होत नाही तोपर्यत रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन होतच राहतील असा इशारा दिला...
छ.शिवरायांच्या पवित्र रायगडात महामार्गाचे रखडलेले काम करण्यासाठी राजे पुन्हा जन्म घ्या असे साकडे घातले..
यावेळी महाआरती सोबत शासनाला जागे करण्यासाठी शाहीर नितीन पवार यांनी महामार्गाची दुरावस्था व १४ वर्षे रखडलेले काम यावर लिहीलेल्या गाण्यातून बाल्या नृत्याची एक बारी करून सर्वांचीच वाहवा मिळवली. छ. शिवरायांच्या या पवित्र रायगड भूमीतील महामार्गाचे रखडलेले काम करण्यासाठी राजे पुन्हा जन्म घ्या असे साकडे घातले.. पत्रकारांचा आवाज त्यांनी आपल्या शायरीतून जनता व शासनापर्यत पोचवला...
चौकटीत :- आंदोलन सुरु असतानाच बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण हे महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी कोलाड नाका येथून पास झाले परंतु त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे महामार्गाच्या एका लेनचे काम काही पुर्ण झालेले नसल्याने त्यांनी आंदोलन स्थळी येण्याचे टाळले...
प्रतिक्रिया ;- महामार्गाचे काम दिलेल्या अवधीत पुर्ण केले नाही तर आपल्याला मनोज जरांगे पाटीलांसारखे उपोषण करावे लागेल, तशी वेळ येऊ देऊ नका...मनोज खांबे , जिल्हाध्यक्ष रायगड प्रेस क्लब
