महाराष्ट्र वेदभुमी

ही मगरींची दहशत संपणार कधी? खांदाड परिसरात सलग सहाव्या वर्षीही मगरीचे अस्तित्व?..चर्चेला उधाण...

बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

माणगाव :- (नरेश पाटील) : पावसाळा सुरू होताच माणगाव नगरपंचायतीच्या महत्त्वाच्या प्रभाग क्रमांक १६ अर्थात खांदाड परिसरात पुन्हा एकदा मगर दिसल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे... सलग सहाव्या वर्षी मगर अस्तित्वाचा मुद्दा ऐरणीवर आला असून मानवी वस्तीच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या जलाशयात मगर असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच या परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, माणगाव नगरपंचायत व संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे...

खांदाड परिसरात वास्तव्यास असलेल्या या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही मुलांना मानवी वस्तीच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या जलाशयात दोन ते तीन मगर पिल्ले दिसल्याचा दावा करण्यात आला आहे... या घटनेनंतर परिसरात मगर अस्तित्वाच्या चर्चेला आणखी उधाण आले असून नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे...

याचदरम्यान परिसरातील एका ज्येष्ठ महिलेशी या प्रतिनिधीसी संवाद साधला असता, त्यांनीदेखील स्वतः मगर पाहिल्याचा दावा केला... त्या म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी त्या जलाशयाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या एका घरात गेल्या असता तेथील युवक मगर आल्याची चर्चा करत होते... त्यानंतर परत येताना त्यांनी स्वतः जलाशयात सुमारे दीड फूट लांबीची मगर स्पष्टपणे पाहिली... याबाबत छायाचित्र किंवा व्हिडिओ घेतला का, असे विचारले असता त्यांनी, "मोबाईल घरीच राहिल्यामुळे छायाचित्र काढता आले नाही," असे सांगितले...

ऑगस्ट २०२६ च्या या पावसाळ्यात मगर अस्तित्वाचा विषय पुन्हा एकदा खांदाड परिसरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे... विशेष म्हणजे, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार व ग्रामस्थांसह खांदाड परिसराला भेट दिली असता मगर दिसत असल्याच्या तक्रारींची माहिती घेऊन परिस्थितीची पाहणी केली होती...

खांदाड परिसरात सलग सहाव्या वर्षी मगर अस्तित्वाची चर्चा होत आहे... गतवर्षी सायंकाळच्या सुमारास याच जलाशयातून एक मध्यम आकाराची मगर बाहेर आल्याचे स्थानिकांनी पाहिले होते... त्यानंतर ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत त्या मगरीला सुरक्षितरीत्या पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले होते... वन विभागाने त्या मगरीला समुद्रकिनाऱ्यालगतच्या खाडीच्या पाण्यात सुरक्षितरीत्या सोडून दिले होते...

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी माणगाव नगरपंचायत, वन विभाग व संबंधित प्रशासनाने जलाशयाचे शास्त्रीय सर्वेक्षण करावे, मगर अस्तित्वाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, धोकादायक ठिकाणी इशारा फलक उभारावेत तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी केली आहे...

यासोबतच जलाशय परिसरातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे... पावसाळ्यात संध्याकाळनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार पसरत असल्याने पादचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे... पुरेशा प्रकाशव्यवस्थेमुळे वन्यप्राण्यांचा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होईल, असे नागरिकांचे मत आहे...

दरवर्षी पावसाळ्यात मगर दिसल्याच्या घटना अथवा चर्चा सातत्याने समोर येत असल्याने हा विषय केवळ अफवा किंवा चर्चेपुरता मर्यादित न ठेवता त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे... मगर पिल्ले असोत किंवा मोठी मगर, या वारंवार समोर येणाऱ्या घटनांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व बंद पथदिवे सुरू करावेत, जलाशय परिसरात आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारावी आणि वन विभागाच्या समन्वयाने दीर्घकालीन उपाययोजना राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे...

Post a Comment

Previous Post Next Post