संततधार पावसाने चेंबर ओव्हरफ्लो; हिरवे, दुर्गंधीयुक्त पाणी नाल्यात, नागरिकांच्या आरोग्याची चिंता
सलग दोन दिवस दूषित पाण्याचा प्रवाह सुरू; कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी
रोहा प्रतिनिधी (राकेश धुमाळ) : रोहा औद्योगिक वसाहतीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रासायनिक सांडपाण्याच्या व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आली आहे. DRT Anthea Aroma Unit-2 कंपनीसमोरून जाणाऱ्या रासायनिक प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या जलवाहिनीचा चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून हिरव्या रंगाचे, तीव्र दुर्गंधीयुक्त दूषित पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे... हे पाणी पावसाच्या पाण्यासोबत रोठ गावाकडे जाणाऱ्या नाल्यात मिसळत असल्याने जलप्रदूषणाची तीव्रता वाढली असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...
याचप्रमाणे FDC कंपनीसमोरील जुन्या चेंबरच्या जागेवर भराव टाकण्यात आला होता... मात्र, मुसळधार पावसामुळे या ठिकाणाहूनही रासायनिक दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत असून ते परिसरात पसरत आहे... तात्पुरता उपाय म्हणून सिमेंटच्या पोत्यांमध्ये वाळू भरून दूषित पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी हा उपाय अपुरा ठरत असल्याचे दिसून येत आहे...
या घटनेमुळे औद्योगिक सांडपाण्याच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे... तसेच, या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे...
