महाराष्ट्र वेदभुमी

डॉ.दीपक देशमुख आणि डॉ. सावंत यांना उपजिल्हा रुग्णालय मध्ये सेवापुर्ती निरोप.

माणगाव :- (नरेश पाटील) : आरोग्य सेवेतील निष्ठा, समर्पण आणि रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी यांचा गौरव करणारा भावपूर्ण निरोप सोहळा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी पार पडला. दोन ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आणि एक जुलै डॉक्टर दिनाचे औचित्य साधत पूर्व संध्येला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या या संयुक्त कार्यक्रमाने उपस्थितांना सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रेरणादायी संदेश दिला...

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश मेहता यांच्या दालनात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष कामेरकर होते. यावेळी अधीक्षक डॉ. महेश मेहता, सेवानिवृत्त होणारे डॉ. दीपक देशमुख आणि डॉ. सावंत हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. पटेल, डॉ. अभिजित मेहता, डॉ. बरफे यांच्यासह रुग्णालयातील विविध विभागांचे डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

याप्रसंगी डॉ. महेश मेहता आणि डॉ. संतोष कामेरकर यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही डॉक्टरांनी आपल्या सेवाकाळात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरवपूर्ण शब्दांत आढावा घेतला. रुग्णसेवा, प्रशासकीय समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी दाखविलेली तत्परता व समर्पणाची अनेक उदाहरणे देत त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली. तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली...

यावेळी डॉ. दीपक देशमुख आणि डॉ. सावंत यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दोन्ही डॉक्टरांनी आपल्या सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल सहकारी डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले...

डॉक्टर दिनानिमित्त अधीक्षक डॉ. महेश मेहता यांनी उपस्थित सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काही कर्मचाऱ्यांची नावे विशेष उल्लेखाने घेत त्यांच्या प्रामाणिक, समर्पित आणि कर्तव्यदक्ष कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास उपअधीक्षक अविनाश साळवी, समाजसेवक संतोष खाडे, गांधी इलेक्ट्रिशियन यांच्यासह रुग्णालय परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते...

सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याचा गौरव आणि डॉक्टर दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावाचा सन्मान अशा दुहेरी उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला. भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने वैद्यकीय सेवेतील निस्वार्थ समर्पण, मानवतावादी दृष्टिकोन आणि कर्तव्यनिष्ठेप्रती उपजिल्हा रुग्णालय परिवाराने व्यक्त केलेला आदर अधोरेखित केला...

Post a Comment

Previous Post Next Post