माणगाव : (नरेश पाटील): दि. १७ एप्रिल २०२६ — माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय (SDH) येथे तज्ज्ञ डॉक्टरांनी सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मानधनाच्या प्रश्नावरून शुक्रवारपासून बेमुदत ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले असून, त्यामुळे आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे... या आंदोलनामुळे बाह्यरुग्ण विभाग (OPD), नियमित तपासण्या तसेच रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला असून ग्रामीण भागातील रुग्णांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे...
गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णसेवेच्या व्यापक हितासाठी अखंड सेवा बजावत असतानाही डॉक्टरांचे मानधन थकित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे... यासंदर्भात वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर डॉक्टरांना बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारावा लागला...
दरम्यान, अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र संपाची घोषणा होताच प्रशासनाने तातडीने हालचाल केल्याचे दिसून आले... आरोग्य विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत प्रतिनिधी माणगाव येथे पाठविला, यावरून प्रशासनाचा प्रतिसाद हा ‘प्रोॲक्टिव्ह’ पेक्षा ‘रिऍक्टिव्ह’ असल्याची चर्चा होत आहे...
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शल्यचिकित्सकांनी अलिबाग येथून निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) डॉ. शिंदे यांची माणगाव येथे नियुक्ती करून परिस्थितीचा आढावा घेतला... डॉ. शिंदे यांनी आंदोलक डॉक्टरांशी सुमारे दोन तास सविस्तर चर्चा केली... या चर्चेदरम्यान आर्थिक व प्रशासकीय मुद्द्यांवरून तीव्र वादविवाद झाल्याची माहिती समोर आली आहे...
आंदोलन समितीचे सदस्य डॉ. संतोष कामेरकर यांनी सांगितले की, “उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे मानधन मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे... सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून, त्यामुळे आम्हाला ‘कामबंद’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.”
प्रशासनाने संप मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी डॉक्टरांनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे... पुढील पाच दिवसांत NRHM आयुक्त व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मानधनाबाबत ठोस आश्वासन दिल्यासच संपाचा पुनर्विचार केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे सादर करण्यात आले असून त्याच्या प्रती संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी व विभागांना पाठविण्यात आल्या आहेत... विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे....
यापूर्वी दि. २६ मार्च २०२६ रोजी हा मुद्दा मंत्री भारतशेठ गोगावले यांच्यासमोर मांडण्यात आला होता... त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते... त्यांच्या पुढाकारामुळे लवकरच प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे...
दरम्यान, नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेहता यांच्याकडूनही परिस्थिती सुधारण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे... मात्र, मंत्रीस्तरावर ठोस निर्णय व आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे डॉक्टरांनी पुन्हा स्पष्ट केले आहे... या वेळी प्रभारी सहायक आधीसेविका (मेट्रन) सिस्टर शिवक्रांती संजय गवळी उपस्थित होते...
प्रशासनाची भूमिका मांडताना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२५ पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले असून जानेवारी २०२६ पर्यंतचा निधी मंजूर झाला आहे; मात्र आर्थिक अडचणींमुळे त्याचे वितरण प्रलंबित आहे. पुढील १५ दिवसांत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले... ‘स्पर्श’ पेमेंट प्रणालीतील तांत्रिक अडचणी व नव्या वितरण प्रक्रियेतील बदल यांमुळेही विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले...
जरी आपत्कालीन सेवा व अतिदक्षता विभाग सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी एकूणच रुग्णालयातील आरोग्य सेवा ताणाखाली असल्याचे चित्र आहे... या प्रश्नाची राज्यभर दखल घेतली जात असून सामाजिक माध्यमांवरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे...
सध्या परिस्थिती गंभीर बनली असून प्रशासन तातडीने ठोस निर्णय घेऊन हा तिढा सोडवते का आणि रुग्णालयातील सेवा पूर्ववत होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
