माणगाव : (नरेश पाटील): शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे... दि. २५ मार्चला पाणीपुरवठ्याच्या वेळी गढूळ व मळकट पाणी नळांमधून येताना दिसले... काही वेळानंतर पाणी स्वच्छ झाले असले तरी सुरुवातीचे दूषित पाणी नागरिकांना वाया घालवावे लागले...
दरम्यान, गुरुवारी दि. २६ मार्चला नियोजित वेळेत पाणीपुरवठा झाला नाही.. तब्बल एका तासाहून अधिक उशिराने पाणीपुरवठा सुरू झाला... त्यातही पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व केवळ ४५ मिनिटेच पुरवठा झाला, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली...
यासोबतच सध्या मार्च अखेरच्या महसूल वसुलीच्या कामानिमित्त माणगाव नगरपंचायतीचे बहुतांश कर्मचारी क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे... त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे...
दुसरीकडे, नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा शुल्कात काही महिन्यापूर्वी वाढ करण्यात असतानाही पाणीपुरवठ्याची सेवा अद्यापही विस्कळीत व समस्याग्रस्तच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतेय...
या संदर्भात नगरपंचायतीच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही... त्यामुळे नेमकी पाणीपुरवठ्यातील अडचण काय, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय....
दरम्यान, एका गृहिणीने पत्रकारांशी बोलताना चिंता व्यक्त केलीय, “ उन्हाळ्याच्या काळात अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पुढील तीव्र उष्णतेच्या दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होईल...” या पार्श्वभूमीवर माणगाव नगरपंचायतीने तातडीने लक्ष घालून पाणीपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होतेय...
