महाराष्ट्र वेदभुमी

बेळगाव सीमावादावर निर्णायक टप्प्याची मागणी; रायगडातून मोहिमेला गती

रायगड:-(नरेश पाटील): दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या बेळगाव सीमाप्रश्नावर आता निर्णायक टप्प्याची मागणी जोर धरू लागली असून, पत्रकारांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या स्वाक्षरी मोहिमेला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागला आहे.. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो मराठी बांधवांच्या भावनांना आवाज देत ही मोहीम आता अधिक व्यापक स्वरूप धारण करत आहे...

     बेळगाव येथील "बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघटना." यांनी या स्वाक्षरी मोहिमेला औपचारिक सुरुवात केली असून, सर्वोच्च न्यायालयात २२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे माननीय मुख्य न्यायमूर्ती यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे... अंतिम सुनावणी घेऊन या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावावा, अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे... सीमाभागातील सुमारे ४० लाख मराठी भाषिक नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत असून, न्यायव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होत आहे...

  दरम्यान, सीमाभागातील रहिवासी असून सध्या रायगडमध्ये वास्तव्यास असलेले आणि या विषयाची सखोल माहिती असलेले आमचे प्रतिनिधी यांनी बेळगाव दौऱ्यादरम्यान बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर यांच्याकडून या मोहिमेची माहिती घेतली... यावेळी त्यांनी स्वाक्षरी मोहिमेची पुस्तिकाही स्वीकारून ती पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला...

   रायगडमध्ये परतल्यानंतर, दि. ३१ मार्च २०२६ रोजी त्यांनी सहकारी पत्रकारांची भेट घेऊन स्वाक्षऱ्या संकलित करण्यास सुरुवात केली... यावेळी महाराष्ट्र लायीव्ह न्यूस संपादक सचिन पवार, वरिष्ठ पत्रकार रिझवान मुकादम, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी दीपक दपके, ज्येष्ठ पत्रकार नरेश पाटील तसेच मानवाधिकार संघटना, माणगाव तालुका अध्यक्ष धीरज पवार उपस्थित होते...

 याच दिवशी सायंकाळी माणगाव पत्रकार संघटनेची बैठक अध्यक्ष संतोष सुतार यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आली आहे... या बैठकीतही स्वाक्षरी मोहिमेबाबत सविस्तर चर्चा होऊन पुढील पाठबळ देण्याचे निश्चित करण्यात आले...

  याचबरोबर, आमचे प्रतिनिधी रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या स्वाक्षरी मोहिमेला अधिक व्यापक पाठिंबा मिळवण्यासाठी दौरा करणार असून, विविध जिल्ह्यांतील पत्रकारांशी संपर्क साधणार आहेत... विशेषतः लातूर येथील समकक्ष पत्रकारांनाही भेट देऊन या अभियानाला बळकटी देण्याचा त्यांचा मानस आहे...

   एकंदरीत, बेळगावपासून सुरू झालेल्या या स्वाक्षरी मोहिमेला रायगडमधूनही लक्षणीय गती मिळत असून, सीमाप्रश्नाच्या निकालासाठी पत्रकार व नागरिक एकवटल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे... आता या एकजुटीचा आवाज सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचून, दीर्घ प्रतीक्षेनंतर न्याय मिळण्याची अपेक्षा अधिक बळावली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post