माणगाव :- (नरेश पाटील)... माणगाव परिसरातील दोन स्वतंत्र घरफोडी प्रकरणांचा वेगवान आणि शिताफीने तपास करून चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात माणगाव पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे... अत्यंत सतर्कता, तपासातील बारकाई आणि गुन्हेगारांवर केलेल्या निर्णायक कारवाईमुळे संबंधित फिर्यादींना त्यांचा मौल्यवान ऐवज परत मिळाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे...
दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी विद्या नगर, सिद्धी कॉम्प्लेक्स, रूम नं. ११२ येथे राहणारे फिर्यादी रविंद्र सोनु पादीर यांच्या घरात घरफोडीची घटना घडली होती... अज्ञात आरोपीने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, पोलीस हवालदार सुरज फडताडे आणि पोलीस शिपाई युवराज दहिफळे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने केला... तपासाच्या चक्राला गती देत त्यांनी आरोपी कोमल गणेश महाडीक (रा. विद्या नगर, सिद्धी कॉम्प्लेक्स) हिला अटक केली आणि चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले...
हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ७१.५०० ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले मंगळसूत्र (सुमारे ₹२,८६,०००), ७.२५० ग्रॅम वजनाचा नेकलेस (₹८०,०००), ५.९५० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या कानातील रिंग (₹२३,०००) तसेच ₹२२,००० रोख रक्कम असा एकूण ₹८,६१,००० किंमतीचा ऐवज समाविष्ट आहे. हा मुद्देमाल दि. २५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी रविंद्र पादीर यांना विधिवत पोलीस ठाण्यात बोलावून परत देण्यात आला...
तसेच, दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास लोणशी येथील रहिवासी दिनेश मधुकर केकाणे यांच्या घरात चोरीची घटना घडली होती... या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आघाव आणि पोलीस शिपाई विकास ढाकणे यांनी बारकाईने करत आरोपी संकेत मुकुंद अजर्लेकर (रा. दापोली) यास अटक केली... आरोपीकडून ५.३७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नक्षीदार कानातील जोड (₹३८,६००) आणि ३.५७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नक्षीदार कोड (₹२५,७००) असा एकूण ₹६४,३०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला... सदर मुद्देमाल दि. २५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी दिनेश केकाणे यांना परत करण्यात आला...
या दोन्ही कारवायांमुळे माणगाव पोलिसांची गुन्हेगारीविरोधातील सजग भूमिका अधोरेखित झाली आहे... अल्पावधीत तपास पूर्ण करून मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन करण्याची ही कार्यपद्धती नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करणारी ठरली आहे... कायदा व सुव्यवस्था राखण्यात माणगाव पोलीस कटिबद्ध असून, गुन्हेगारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या यशस्वी कारवाईतून पुन्हा एकदा देण्यात आला आहे...
