अलिबाग : रायगड जिल्ह्यात जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच चौल मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल तुलाडदेवी येथे रविवारी (दि. १८ जानेवारी) घेतलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. या बैठकीला जनतेची तोबा गर्दी पाहायला मिळाली. ही अभूतपूर्व उपस्थिती म्हणजेच सुरेंद्र म्हात्रे यांची वाढती लोकप्रियता असून, हीच गर्दी पाहून विरोधकांची झोप उडणे अटळ आहे, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले...
या महत्त्वपूर्ण बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, विजय चौलकर, मधुकर फुंडे, सुरेश खोत, निलेश खोत, शरयू स्वप्नील अधिकारी यांच्यासह कार्यकर्ते, काँग्रेसचे तालुका प्रमुख भास्कर चव्हाण, आशिष गोंधळी, महेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शिवसेनेचे अशोक नाईक, विनायक म्हात्रे, सूरज म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
यावेळी बोलताना सुरेंद्र म्हात्रे यांनी विरोधकांवर प्रखर शब्दांत हल्लाबोल केला. खोटी आश्वासने देणे, आधीच झालेली कामे नव्या स्वरूपात दाखवून ग्रामस्थांची दिशाभूल करणे, ३०० कोटींचा निधी आणल्याचे हवेतले दावे करून जनतेला स्वप्ने दाखवणे, असे प्रकार विरोधक सातत्याने करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पैशांचा महापूर दाखवून फोडाफोडीचे राजकारण, खोटी टेंडरिंग आणि जनतेची फसवणूक सुरू आहे, आणि म्हणूनच ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ही निवडणूक आपल्याला जिंकलीच पाहिजे” या निर्धाराने प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले...
कोविडसारखी महाभयंकर महामारी, निसर्ग चक्रीवादळ आणि त्यात चौल परिसराचे १०० टक्के नुकसान झाले असताना, चौलचा बागायतदार पूर्णपणे उध्वस्त झाला होता. त्या कठीण काळात आमदार आणि विरोधक कुठे होते? असा थेट सवाल उपस्थित करत, ती वेळ जनता विसरलेली नाही, अशी घणाघाती टीका सुरेंद्र म्हात्रे यांनी केली...
दरम्यान, बैठकीत बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. “टक्केवारीत काम करणारे आम्हाला नकोत. यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, पण आम्ही कधीही टक्के घेऊन काम केले नाही. मात्र चूक तुमचीही आहे आणि आमचीही आहे; आम्हीच आमदार मोठा केला. आजपर्यंत त्या आमदाराने विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडले नाहीत,” असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. “लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर या गद्दारांना गाडावेच लागेल. सुरेंद्र म्हात्रे यांना प्रचंड मतांनी निवडून देणे हाच एकमेव मार्ग आहे. सुरेंद्र म्हात्रे हे फक्त शिवसेनेचे उमेदवार नाहीत, ते शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेसचेही उमेदवार आहेत, असे समजून प्रत्येकाने काम करावे,” असे ठाम विधान जयंत पाटील यांनी केले...
चौलमध्ये झालेल्या या आढावा बैठकीने निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे...
