"दुर्गंधीच्या विळख्यातून सुटका: नागरिकांच्या संघर्षाला यश, नाल्यात सांडपाणी सोडणं बंद!"
"सामूहिक संघर्षाचं फळ: सांडपाणी रोखलं, आरोग्याच्या दिशेने निर्णायक वाटचाल!"
माणगाव :- (नरेश पाटील) – वॉर्ड क्र. 16 मधील मोर्बा रोडला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यालगतच्या तीन मजली इमारतीमधून गेल्या कैक महिन्यांनापासून बेकायदेशीरपणे सांडपाणी अर्धवट पावसाच्या नाल्यात सोडले जात होते. या कृतीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी, मच्छरांचा सुळसुळाट आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. अनेक निवेदने, तक्रारी, थेट भेटी आणि सातत्याने पाठपुरावा करून अखेर 28 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता या सांडपाणी वाहतुकीला पूर्णविराम मिळाला...
ही समस्या केवळ आरोग्याची नव्हती, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाची गंभीर साक्ष होती. न.पं.कडून अर्धवट सोडले गेलेले नाले बांधकाम हेच गैरप्रकाराला निमित्त ठरले. नागरिक, विशेषतः महिलांनी पुढाकार घेत आपल्या खर्चाने नाल्यावर माती टाकून त्याचा वापर थांबवला, ही एक सामाजिक सलोख्याची आणि कृतीशीलतेची अत्यंत प्रेरणादायी घटना ठरली...
न.पं.ला जाग येईपर्यंत हा संघर्ष अनेक टप्प्यांवरून गेला – नोटीस बजावणे, दुर्लक्ष, रात्रीच्या वेळी सांडपाणी सोडण्याचे प्रयत्न, आणि नागरिकांचा आक्रमक होऊन विविध यंत्रणांशी संपर्क. शेवटी प्रशासन हलले, नोटीसला उत्तर मिळाले आणि इमारतीतील सेप्टिक टँक स्वच्छ करण्यात आले...
आज परिसर दुर्गंधीपासून हळूहळू मुक्त होत आहे आणि नागरिकांनी न.पं.कडे या निर्णयाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी, उर्वरित नाल्याचे बांधकाम आणि इतर प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे...
या लढ्याला दिशा देणारे, सातत्याने माध्यमातून आवाज उठवणारे आमचे प्रतिनिधी त्याच बरोबर कर्तव्यध्यक्ष नगरसेवक ज्ञानदेव पोवार यांचे हा समस्या दूर होण्यास लाभलेला अत्यन्त मोलाचा मार्गदर्शन व मदत आणि आमचा महाराष्ट्र वेदभूमी यांचे सातत्यने केलेल्या पाठपुरावा मुळे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे...
