महाराष्ट्र वेदभुमी

पालक सचिव डॉ गोविंदराज यांनी केला क्षेत्रीय पाहणी दौरा

 

दौऱ्यात विद्यार्थी, शेतकरी, क्षेत्रिय अधिकारी यांच्याशी साधला संवाद

रायगड :-  दि. २७-- केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात... तसेच जिल्हा प्रशासन देखील जिल्ह्याच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. जिल्ह्यात या उपक्रमांची सूरु असलेली अंमलबजावणी, याचा लाभार्थ्यांना होणारा फायदा, त्यामुळे झालेला बदल एकूणच या योजनांची फळश्रुती याची प्रधान सचिव नगरविकास (2) तथा रायगड जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. के. एच गोविंदराज यांनी प्रत्यक्ष पाहणी केली...

पालक सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी आज रायगड जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या भेटीपूर्वी त्यांनी क्षेत्रीय पाहणी दौरा केला.  या दौ-यात त्यांनी जिल्हा परिषद शाळा, पांढरा कांदा उत्पादक शेतकरी, कांदा बियाणे निर्मिती उपक्रम, सामाजिक वनीकरण बांबू रोप वाटिका येथे भेट देऊन पाहणी केली. संबंधितांशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे, उपसचिव सुशिला पवार, कक्ष अधिकारी अर्जुन लांडगे यांसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते...

जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेतला भेट, साधला विदयार्थ्यांशी संवाद

सर्वप्रथम रायगड जिल्हा परिषद मॉडेल स्कूल वायशेत, तालुका अलिबाग येथे भेट दिली. यावेळी शाळेतील शासकीय योजनांची पाहणी केली व त्यांची माहिती मुख्याध्यापक श्री महेश ठाकूर यांच्याकडून घेतली. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, रोबोटिक व कोडींग लॅब, डिजिटल क्लासरूम, अटल टिंकरिंग लॅब यासोबत शाळेतील अनेक उपक्रमांची माहिती घेतली... 

     अब्दुल कलाम लॉन्च वेहिकल मिशन 2021 उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण ही मोहीम डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम यांच्यातर्फे आयोजित केली होती. या राष्ट्रीय मोहिमेमध्ये या जिल्हा परिषदेच्या तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद सेस फंडातून या विद्यार्थ्यांना तामिळनाडू राज्यातील पट्टीपुलम येथे प्रक्षेपणास उपस्थित राहण्यासाठी अनुदान दिले होते. त्यामध्ये तीन विद्यार्थी शाळेतील दोन शिक्षक व मुलांचे पालक सहभागी झाले होते. याची सविस्तर माहिती कुमारी बबिता चौहान हिने दिले. पालक सचिव गोविंदराज यांनी याचे विशेष कौतुक केले...

   अटल ट्विंकरिंग लॅब,  रोबोटिक लॅब, डिजिटल क्लासरूम यांना साहेबांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. प्रयोगशाळेचे कार्य कसे चालते? कोणते साहित्यामध्ये कोणते तत्व आहे? याबद्दल विद्यार्थ्यांकडून माहिती समजून घेतली व रोबोटिक्स आणि कोडींग लॅबमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेलचे सादरीकरण  पाहिले. डिजिटल क्लासरूम मध्ये विद्यार्थ्याला दिलेले संगणक प्रत्यक्ष हाताळता येते का? याची माहिती घेतली. कुमारी अफसर सदफ शेख हिने स्वयं अध्ययनात याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो हे सांगितले...

रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची फी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्यात येते.  रायगड टॅलेंट सर्च या नाविन्यपूर्ण व अनोख्या माध्यमातून इयत्ता तिसरी पासून आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग, सराव चाचण्या व रात्रीच्या निवासी कार्यशाळा घेण्यात आलेले आहे त्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. अनेक शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. व त्यांचा उपयोग चांगला होत आहे, असे पुनिता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सांगितले...

जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाबद्दल श्री गोविंदराज यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे विशेष कौतुक केले.पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

बांबू रोपवाटीकेची पाहणी

महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार बांबू क्षेत्र व उत्पादनात वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांनी विशेष बांबू रोप निर्मिती मोहीम घेतली आहे.  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत बांबू रोपांची निर्मिती करण्याचा नाविण्यपूर्ण प्रयोगाची पाहणी सामाजिक वनीकरणच्या रोप वाटीकेस भेट देऊन केली.  रायगड जिल्ह्यात वनविभाग रोहा यांच्या ५ रोपवाटिका, वनविभाग अलिबाग यांच्या १५ रोपवाटिका, सामाजिक वनीकरण विभागाच्या १३ रोपवाटिका आणि कृषी विभागाच्या ७ रोपवाटिका अशा एकूण ४० रोपवाटिकांमध्ये २८ लक्ष बांबू रोपं लागवडीचे काम सुरु करण्यात आले आहे..

राज्यात बांबू रोप वाटिका तयार करणारा रायगड जिल्हा ऐकमेव जिल्हा आहे. निर्धारित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून बांबू आधारीत उद्योगास चालना द्यावी असे निर्देश त्यांनी संबंधितास दिल्या...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर

रायगड जिल्ह्यातील अलिबागचा पांढरा कांदा चवीला गोड आणि औषधी गुणांसाठी ओळखला जातो. या कांद्याची चव आणि गुणधर्म जगभरात प्रसिद्ध आहेत. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय भौगोलिक मानांकन (Geographical Indication) मिळाले आहे. कार्लेखिंड  परिसरातील सांगावं येथील कांदा उत्पादक शेतकरी सतीश पाटील यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. कांदा बीज निर्मिती, कांदा लागवड, येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केली. या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनातून लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही श्री गोविंदराज यांनी सांगितले...

वरसोली समुद्र किनारा येथे भेट देऊन समुद्र किनारा स्वच्छतेसाठी येणाऱ्या बीच क्लीनिंग मशीन ची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ व सुंदर ठेवावेत अशा सूचना यावेळी दिल्या..

जिल्हा परिषद रायगड येथे भेट देऊन नूतन कार्यालयाची पाहणी आणि x रे मशीनची पाहणी केली. शेष फंडातुन दिव्यांग बांधवाना दिलेल्या मोबाईल इ शॉपला(फिरत्या वाहनावरील दुकान) भेट देऊन संवाद साधला...

Post a Comment

Previous Post Next Post