महाराष्ट्र वेदभुमी

रोहा औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत वाहनतळाचा प्रश्न ऐरणीवर, मनसे रोहा तालुका प्रमुख आंदोलनाच्या पवित्र्यात..

रोहा प्रतिनिधी: ( राकेश धुमाळ): दिनांक ३० जून २०२६ रोजी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील जैनवाडी थांब्याजवळील अनधिकृत वाहन तळाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे निवेदन मनसे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय नथुराम रटाटे  यांनी मा. उपजिल्हाधिकारी रायगड यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांना दिले असून यावेळी त्यांच्या सोबत मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पोलसानी, साहिल म्हसकर, रुपेश कराळे, नितीन मोडे आदी मनसे सैनिक उपस्थित होते...

   रोहा औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, दररोज कच्च्या पक्क्या रासायनिक पदार्थांची आवक जावक  करणाऱ्या हजारो वाहनांची वर्दळ असते... परंतु त्या क्षमतेचे वाहनतळ उपलब्ध नसल्याने अनेक अवजड वाहने औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा कंपनीच्या समोर अनधिकृतरित्या उभी केलेली असतात, तर काही वाहन ही जैनवाडी थांब्या समोर रोहा कोलाड मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभी केली जातात... या अवजड वाहनांचे चालक व त्यांचे सहकारी इथेच वास्तव्य करत असतात, बऱ्याचदा येथेच स्वयंपाक बनविला जातो... या ठिकाणी उभ्या असणाऱ्या वाहनांमध्ये विविध प्रकारची रसायने असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही... त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास, पर्यावरणास आणि सार्वजनिक आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो... 

   गेली दोन वर्षे या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ रोहा यांच्या कार्यालयात व पोलीस निरीक्षक धाटाव यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही... त्यामुळेच अक्षय रटाटे यांनी उपजिल्हाधिकारी रायगड आणि पोलिस अधीक्षक रायगड यांच्याकडे दाद मागितली आहे...  येणाऱ्या तीस तारखेपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही तर रोहा तालुका मनसेच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे... परिसरातील नागरिकांचं लक्ष तीस तारखेकडे लागले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post