महाराष्ट्र वेदभुमी

रुग्णालय की मृत्यूचा सापळा?

 


रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; जीव वाचले, पण प्रशासन जागे होणार कधी?

अलिबाग (ओमकार नागावकर) : रायगड जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रविवारी (दि. २८ जून) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्या वेळी संबंधित ठिकाणी कोणताही रुग्ण, नातेवाईक किंवा कर्मचारी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या घटनेने शासकीय रुग्णालयांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे...

ज्या रुग्णालयात नागरिक उपचारासाठी येतात, त्याच ठिकाणी त्यांच्या जीवाची शाश्वती नसेल तर ही जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे...

रुग्णालयाच्या इमारतीची नियमित देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेबाबत संबंधित यंत्रणांनी वेळेत उपाययोजना केल्या होत्या का? या घटनेमागे निष्काळजीपणा होता का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे...

नागरिकांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच संपूर्ण रुग्णालयाचे स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करून धोकादायक भाग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे...

आज स्लॅब कोसळला आणि जीव वाचले… पण उद्या एखादा निरपराध रुग्ण किंवा कर्मचारी त्याचा बळी ठरला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? जीवितहानी झाल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे, अशी तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post