महाराष्ट्र वेदभुमी

विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे मुख्याध्यापक सुरेश जंगम शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त,

 


भावनिक वातावरणात सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न.

पुगांव - रोहा :- (नंदकुमार कळमकर) : रोहा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्री.रा. ग. पोटफोडे (मास्तर) विद्यालय, खांब येथील मुख्याध्यापक तथा इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश जंगम यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला... तब्बल ३४ वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावून त्यांनी नुकतीच सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या निरोप समारंभावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते...

 सुरेश जंगम यांनी आपल्या अध्यापन कारकिर्दीची सुरुवात श्रमिक विद्यालय, चिल्हे येथून शिक्षक म्हणून केली व त्यानंतर त्याच शाळेत त्यांना बढती मिळून ते मुख्याध्यापक झाले... इंग्रजी विषयाचे प्रभावी अध्यापन, विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि शिस्तप्रिय कार्यपद्धती यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली... त्यानंतर त्यांची बदली होऊन खांब येथील श्री.रा. ग. पोटफोडे (मास्तर)विद्यालय, खांब येथे आपल्या सेवेत रूजू झाले...मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला... विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी आणि शाळेची शैक्षणिक उंची वाढावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले... त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करत देश-विदेशात आपले नाव उज्ज्वल केले आहे...पंचक्रोशीत शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या रा. ग. पोटफोडे यांनी स्थापन केलेल्या संस्थेत जंगम सर यांनी ज्ञानदानाचे कार्य अत्यंत निष्ठेने आणि समर्पित भावनेने केले... विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत त्यांनी शिक्षक या पदाची खरी प्रतिष्ठा जपली... त्यामुळेच त्यांच्या सेवानिवृत्तीच्या क्षणी अनेक विद्यार्थी आणि नागरिक भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले...

या सेवापूर्ती सोहळ्यास संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे, उद्योजक दिलीप पोतनीस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अविनाश म्हात्रे, संस्थेचे सचिव धोंडू कचरे, संचालक शंकरराव म्हसकर, बामणे, धनाजी लोखंडे, बाळाराम धामणसे, नंदकुमार कापसे, गजानन भोईर, सुभाष माटल, नरेंद्रशेठ जाधव, चिल्हे हायस्कूलचे मुख्याध्यापक दिपक जगताप, बळीराम चव्हाण, विनय मारगे, नितीन गोरिवले, कृष्णाराम धनवी, नरेंद्र माळी,मॅनेजर गजानन बामणे, ज्ञानेश्वर वरखले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते... तसेच जंगम सर यांचे कुटुंबीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या..

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सुरेश जंगम सर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना त्यांच्या सेवाभावी वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला... समारोपाच्या वेळी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या...

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र तुपकर यांनी केले...तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिल्पा मरवडे यांनी केले...तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले...

Post a Comment

Previous Post Next Post